विशाल करोळे, जालना : जालना जिल्ह्यात भाजप आमदाराच्या अरेरावीला कंटाळून बदनापूरच्या पोलीस निरीक्षकानं थेट कुटुंबासह आत्महत्या करणार असल्याचा एसएमएस पोलीस अधीक्षकाला पाठवला आणि गोंधळ उडाला.
आदरणीय मॅडम
गुड आफ्टरनून,
माझं पोस्टिंग बदनापूर पोलीस स्टेशनमध्ये आहे. सुरूवातीपासूनच स्थानिक आमदार श्री. नारायण कुचे पोलीस ठाण्याच्या कायदेशीर बाबींमध्ये ढवळाढवळ करतायत. मी त्यांचे आदेश मानण्यास नकार दिल्यामुळे मला आणि माझ्या स्टाफला धमकावलं. याच्या ऑडिओ क्लिप्स आणि स्टेशनमधील डायरीतल्या नोंदी माझ्याकडे आहेत. आज त्यांनी मला कलम ६८ नुसार धमकावलं. त्यामुळे मी हे प्रकरण तुमच्याकडे मांडतोय. आपली यंत्रणा पोलिसांना संरक्षण देण्याबाबत अगतिक आहे, या निष्कर्षावर मी आलोय. मी कुटुंबासह आत्महत्येचा विचार करतोय. सगळ्या क्लिप्स आणि नोंदी आदरणीय मुख्यमंत्री आणि पंतप्रधान कार्यालयाला पाठवतोय.
- विद्यानंद काळे, पोलीस निरीक्षक, बदनापूर
हा एसएमएस पाहिल्यावर भाजप आमदार नारायण कुचे पीआय काळे यांना धमकावलं असल्याचं दिसतंय. २ ऑगस्ट रोजी बदनापूर पोलीस स्टेशनला गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक झाली. त्यात व्यापाऱ्यांना कलम ६८ अन्वये नोटीस देऊन गुलाल विकण्यावर बंदी घालण्यात आली. त्यानंतर व्यापाऱ्यांनी आमदाराची भेट घेऊन नाराजी व्यक्त केली. आमदार कुचे यांनी काळे यांना फोन करून अर्वाच्य भाषेत दमदाटी केली. त्यामुळे काळेंनी हा एसएमएस पोलीस अधीक्षकांना पाठवला आणि सर्व मोबाईल बंद ठेवले. त्यामुळे ३ ऑगस्ट रोजी जालना आणि औरंगाबादचे पोलीस काळेंना शोधत होते. अखेर रात्री ते पोलिसांना सापडले. आमदार नारायण कुचेंनी मात्र हे आरोप फेटाळलेत.
आमदार प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे निकटवर्ती मानले जातात. याआधीही अवैध वाळूचा ट्रक सोडून देण्याचा कुचेंचा आदेश काळेंनी धुडकावला होता. त्यानंतर एका अपघात प्रकरणात आरोपीला सोडण्यासही सांगितलं गेलं. पोलीस स्टेशनमध्ये फोन करून एका हवालदारालाही धमकावलं. याची स्टेशन डायरीत नोंद आहे. या प्रकरणात अधीक्षकांनी चौकशी करून अहवाल देण्याचा आदेश महानिरीक्षक अजित पाटील यांनी दिलाय.
राज्यात पोलिसांवर हल्ल्यांचे प्रकार वाढत असताना आमदाराच्या जाचामुळे एका निरीक्षकाच्या मनात आत्महत्येचा विचार येणं धक्कादायक आहे. कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या पोलीसांनाच जर असुरक्षित वाट असेल, तर ही बाब गंभीर आहे.