पंढरपूर : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना पंढरपूरचा सुपुत्र मेजर कुणालगीर मुन्नागीर गोसावी हे आज पहाटे जम्मू मध्ये अतिरेक्यांसोबत झालेल्या चकमकीत शहीद झाल्याची माहिती त्यांचे वडील मुन्नागीर गोसावी यांनी दिली. मात्र, जिल्हा प्रशासनाने या वृत्तास दुजोरा दिला नाही.
मेजर गोसावी हे गेल्या नऊ वर्षांपासून सैन्यात आहेत. २६ नोव्हेंबर रोजी ते पंढरपूरातून कुटूंबियासोबत सुट्टी घालवत असताना तातडीने सैन्यातून बोलावणं आल्यानं सेवेत हजर होण्यासाठी गेले होते. मेजर कुणालगीर यांच्या पश्चात आई वडील, दोन भाऊ, पत्नी उमा, चार वर्षांची मुलगी उमंग आहेत.
कुणालगीर याचं प्राथमिक शिक्षण पंढरपूरातील आदर्श विहार, माध्यमिक शिक्षण कवठेकर प्रशालामध्ये झालं असून ते एनडीए मध्ये भरती झाल्यानंतर तेथील प्रशिक्षण पूर्ण करून सैन्य दलात हजर झाले.
जम्मू काश्मीर दोन दहशतवादी हल्ल्यांनी हादरलंय. नगरोटामध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत एक मेजर आणि दोन जवान शहीद झालेत. या हल्ल्यात काही जवान जखमीही झालेत.
पहाटे पाच वाजल्याच्या सुमाराला दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. ३ ते ४ दहशतवाद्यांनी गेटवर गोळीबार केला. ग्रेनेड हल्ला करत दहशतवादी कॅम्पमध्ये शिरले. गोळीबार करतच हे दहशतवादी ऑफिसर्स मेसमध्ये पोहचले. गोळीबाराचा आवाज येताच जवानांनीही प्रत्युत्तर द्यायला सुरूवात केली. जवानांनी या दहशवाद्यांना घेरलंय. अजुनही चकमक सुरूच आहे. दरम्यान प्रतिहल्ल्यात एक दहशतवादी ठार झालाय.
या चकमकीनंतर जम्मू श्रीनगर हायवे बंद करण्यात आलाय. तसंच नगरोटा भागातल्या शाळाही बंद ठेवण्यात आल्यात. तर दुसरीकडे सांबामधील चमलियाल या भागातही दहशतवैदा्यांनी हल्ला केलाय. यात ३ दहशवाद्यांना ठार करण्यात आलंय. तर पाच जवान इथे जखमी झालेत.