फी नाही तर विद्यार्थ्यानं वर्गात बसायचं नाही, शाळेची मुजोरी

शाळेची फी भरली नाही म्हणून दोन शालेय विद्यार्थ्याला शैक्षणिक तसंच मानसिक त्रास दिल्याचा धक्कदायक प्रकार, धुळे शहरातल्या पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये घडला आहे. या घटनेनंतर अनेक पालकांनी शाळेच्या मुजोर कारभाराविरोधात आवाज बुलंद केला आहे. 

Updated: Jul 24, 2015, 11:18 PM IST
फी नाही तर विद्यार्थ्यानं वर्गात बसायचं नाही, शाळेची मुजोरी title=

धुळे : शाळेची फी भरली नाही म्हणून दोन शालेय विद्यार्थ्याला शैक्षणिक तसंच मानसिक त्रास दिल्याचा धक्कदायक प्रकार, धुळे शहरातल्या पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये घडला आहे. या घटनेनंतर अनेक पालकांनी शाळेच्या मुजोर कारभाराविरोधात आवाज बुलंद केला आहे. 

पालकांनी मुलाची शाळेची फी भरली नाही म्हणून, धुळे शहरातल्या पोद्दार इंटरनॅशनल स्कूलनं पवन छोटू वरसे या इयत्ता आठवीतल्या विद्यार्थ्याला चक्क चार महिने वर्गातच बसू दिलं नाही. शिवाय त्याला अनुत्तीर्ण केल्याचा आरोप विद्यार्थ्याच्या पालकांनी केला आहे.  

शाळेकडून होत असलेल्या मानसिक त्रासामुळे छोट्या पवनच्या बालमनावर परिणाम झालाय. त्यामुळे त्याची मानसिक स्थितीही बिघडलीय, असं पवनच्या पालकांचं म्हणणं आहे. शाळेची मान्यता रद्द करण्यात यावी अशी मागणी पालकांनी केलीय. तसंच या प्रकरणी धुळ्यातील पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

या प्रकाराची माहिती मिळताच लोकसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी शाळा प्रशासनाला घेराव घालत जाब विचारला. तर शिक्षण अधिकाऱ्यांनीही शाळा व्यवस्थापनाकडे विचारणा केल्याचं, धुळ्याचे प्राथमिक शिक्षण अधिकारी मोहन देसले यांनी म्हटलंय. तसंच तक्रारीत सत्यता असून या प्रकरणी शाळेवर कडक कारवाई व्हावी यासाठी सखोल अहवाल आपण शिक्षण उपसंचालकांकडे पाठवणार असल्याचं देसले यांनी म्हटलंय.  

पालकांच्या तक्रारीनंतर या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वतःचा आंतरराष्ट्रीय दर्जा मिरवणाऱ्या शैक्षणिक संस्था विद्यार्थ्यांचा कसा छळ करतात, याचंच उदाहरण यातून पाहायला मिळत आहे. म्हणून अशा संस्थेवर कायदेशीर कारवाई होणं गरजेचं आहे.  
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.