धक्कादायक: बेसुमार वाळूउपशानं गोदेवरील पूल खचला

गोदापात्रतील बेसुमार अवैध वाळूउपशाचा फटका शनिवारी औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील पुलाला बसला. जायकवाडी धरणातून दोन बंधाऱ्यांसाठी गोदापात्रत पाणी सोडताच पैठण तालुक्यातील आपेगाव आणि बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील कुरणपिंप्री या गावांना जोडणारा पूल अचानक खचला. थोड्याच वेळात पुलाला जागोजागी तडे गेले. त्यामुळं दोन्ही तालुक्यांचा संपर्क तुटला आहे.

Updated: Nov 9, 2014, 06:04 PM IST
धक्कादायक: बेसुमार वाळूउपशानं गोदेवरील पूल खचला title=

औरंगाबाद/पैठण : गोदापात्रतील बेसुमार अवैध वाळूउपशाचा फटका शनिवारी औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील पुलाला बसला. जायकवाडी धरणातून दोन बंधाऱ्यांसाठी गोदापात्रत पाणी सोडताच पैठण तालुक्यातील आपेगाव आणि बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील कुरणपिंप्री या गावांना जोडणारा पूल अचानक खचला. थोड्याच वेळात पुलाला जागोजागी तडे गेले. त्यामुळं दोन्ही तालुक्यांचा संपर्क तुटला आहे.

महसूल विभाग आणि पोलिसांच्या आशीर्वादामुळं औरंगाबाद जिल्ह्यात सध्या वाळूचा बेसुमार उपसा सुरू आहे. वाळूपट्ट्यांची मुदत संपूनही वाळूमाफियांनी उपसा सुरूच ठेवला आहे. अनेक ठिकाणी पुलांच्या पायथ्याची वाळूसुद्धा उपसली जात आहे. अशा वाळूउपशामुळं पैठण तालुक्यातील आपेगाव आणि गेवराई तालुक्यातील कुरणपिंप्री या दोन 
गावांना जोडणारा पूल कमकुवत झाला होता. त्यात शुक्रवारी जायकवाडी धरणातून आपेगाव आणि हिरडपुरी बंधाऱ्यासाठी गोदावरी नदीच्या पात्रत पाणी सोडण्यात आलं. आधीच कमकुवत झालेला हा पूल पाण्याच्या प्रवाहामुळं खिळखिळा झाला. 

पाण्याच्या प्रवाहामुळं पायाजवळील भरावाचा आधार निखळला. त्यामुळं हा पूल मधोमध खचला असून, त्याला अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. या घटनेनंतर काही गावकऱ्यांनी वेळीच इथून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांना सूचना दिली. त्यामुळं मोठी दुर्घटना टळली. 

बारा वर्षापूर्वी झालं पुलाचं बांधकाम

हा पूल दोन तालुक्यांना जोडणारा असल्यानं इथून वाहतुकीचं प्रमाण जास्त आहे. पूल खचल्यामुळं वाहनांची ये-जा आता बंद झाली आहे. नदी दुथडी भरून वाहत असल्यामुळम लोकांनी भीतिपोटी पुलावरून पायी जाणंही बंद केलंय. 

पाटेगाव पुलाची तपासणी करावी

गोदावरी नदीवरील पैठण - शेवगाव रोडवरील पाटेगावजवळील पुलाच्या शेजारीही वाळूमाफियांकडून अमाप वाळूउपसा सुरू आहे. यामुळं हा पूलही कमकुवत झाला. या पुलावर खड्डे पडले आहेत. त्यामुळं या पुलाचीही तपासणी करावी, अशी मागणी स्थानिक करीत आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.