जळगाव: जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे-खेवलकर तर उपाध्यक्षपदी पाचोराचे शिवसेना आमदार किशोर पाटील यांची बिनविरोध निवड झालीय.
एकनाथ खडसे यांनी अत्यंत प्रतिष्ठेची केलेल्या बँकेच्या निवडणुकीत २१ पैकी १८ जागांवर सहकार पॅनलनं घवघवीत यश मिळवत खडसे गटानं जोरदार मुसंडी मारली होती. तर विरोधी लोकमान्य शेतकरी पॅनलच्या पदरात अवघ्या ३ जागा पडल्या होत्या.
त्यामुळे बँकेवर भाजप, शिवसेना तसंच राष्ट्रवादीचा एक गट मिळून खडसे यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनलला निर्विवाद बहुमत मिळालं होतं. कन्या रोहिणीला अध्यक्ष करण्यासाठी खडसे यांनी जोरदार फिल्डिंग लावली होती.
विशेष म्हणजे रोहिणी खडसे जिल्हा बँकेच्या १०० वर्षांच्या इतिहासातील पहिल्या महिला अध्यक्ष ठरल्या आहेत. आपल्याला सहकारचा चांगला अनुभव असल्यानं जिल्हा बँकेचा कारभार चांगल्या रितीनं पाहू असा विश्वास रोहिणी खडसेंनी व्यक्त केला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.