पुणे : पोलीस उपनिरीक्षकाने २० वर्षीय तरुणीवर लग्नाचे आमीष दाखवून बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
हडपसरमधील ३० वर्षीय संतोष सोनवणेवर बलात्काराचा आरोप आहे. सोनवणेविरोधात या प्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी सोनवणेला अटक केली आहे.
संतोषने मागील पंधरवड्यात संबंधित मुलीला मुंबईत बोलवून घेतले. तसेच भाड्याच्या फ्लॅटमध्ये बंद करून ठेवले होते. इकडे, तरुणीच्या पालकांनी ती बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसात दाखल केली. पोलिसांनी तिचा मोबाईल मुंब्रा येथे असल्याचे सांगितले.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, संतोष सोनवणे हा सध्या ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथे पोलिस उपनिरीक्षकपदावर कार्यरत आहे. तर त्याची पत्नी पुण्यात नोकरी करते.
सुटीच्या काळात सोनवणे पत्नीला भेटण्यासाठी पुण्यात अधूनमधून यायचा. याच दरम्यान, सोनवणेची सासऱ्याच्या मित्राशी ओळख झाली, त्यांना एक २० वर्षांची मुलगी आहे.
मुलीला चांगल्या ठिकाणी प्रवेश मिळवून देतो, म्हणून त्याने तिच्याशी ओळख वाढविली. पुढे संतोष सोनवणेने तिच्याशी जवळीक साधत लग्नाचे आमीष दाखवले आणि अत्याचार केल्याचा आरोप आहे.