पुण्याचा नव्या महापौरांनी केला हा विक्रम

 पुणे महापालिकेच्या ६७ वर्षांच्या इतिहासात प्रथमच भाजपचा महापौर झाला आहे. तर उपमहापौरपदी आरपीआयचे नवनाथ कांबळे यांची निवड झालीय. भाजपकडे स्पष्ट बहुमत आहे, तरीही काँग्रेस आणि राष्ट्रवादीने उमेदवार दिल्यानं ही निवडणूक झाली

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Mar 15, 2017, 07:46 PM IST
पुण्याचा नव्या महापौरांनी केला हा विक्रम   title=

नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे  :  पुणे महापालिकेच्या ६७ वर्षांच्या इतिहासात प्रथमच भाजपचा महापौर झाला आहे. तर उपमहापौरपदी आरपीआयचे नवनाथ कांबळे यांची निवड झालीय. भाजपकडे स्पष्ट बहुमत आहे, तरीही काँग्रेस आणि राष्ट्रवादीने उमेदवार दिल्यानं ही निवडणूक झाली
 
निवडणुकीआधीच मिरवणूक, सर्वत्र भाजपचे झेंडे, रांगोळ्यांच्या पायघड्या आणि फेटे घालून आलेले नगरसेवक. पुणे महापालिकेतील वातावरण असं भाजपमय होऊन गेलं होतं. महापौर आणि उपमहापौर पद भाजपाला मिळणार हे निश्चित होतं. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांमुळे मतदान झालं. ही औपचारिकता पार पडली आणि मुक्ता टिळक महापौर झाल्या. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच भाजपचा महापौर झाला आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. 

उपमहापौर पदासाठीही निवडणूक झाली. ही औपचारिकता पार पाडत नवनाथ कांबळेही उपमहापौरपदी विराजमान झाले. टिळक आणि कांबळे यांना ९८ मते पडली तर, राष्ट्रवादीच्या महापौरपदाच्या उमेदवार नंदा लोणकर आणि काँग्रेसच्या उप महापौरपदाच्या उमेदवार लता राजगुरू यांना ५२ मते मिळाली. शिवसेनेनेही दोन्ही पदांसाठी उमेदवार दिले होते. मात्र, त्यांनी माघार घेतली. मनसेच्या दोन नगरसेवकांनी निवणुकीवर बहिष्कार टाकला तर एमआयएमच्या एका नागरसेविकेनं काँग्रेस - राष्ट्रवादीला मतदान केलं. 

लोकसभा विधानसभा आणि आता महापालिका... पुण्यात अशी एक हाती सत्ता भाजपला मिळाली आहे. आता, पुणेकरांना या सत्तेचा किती आणि कसा लाभ मिळतोय हे लवकरच कळेल.