पुणे : पुण्यातील कचराकोंडी तात्पुरती का होईना सुटलीय. उरूळी देवाची आणि फुरसुंगी येथील कचरा प्रश्न सोडविण्यासाठी महिनाभरात आराखडा तयार करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतर ग्रामस्थांनी कचराबंद आंदोलन मागे घेतलंय. गेल्या 22 दिवसांपासून पुण्यात सुरू असलेल्या आंदोलनानंतर मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात बैठक घेतली.
खासदार सुप्रिया सुळे, खासदार अनिल शिरोळे, आमदार विजय शिवतारे, महापौर मुक्ता टिळक यावेळी उपस्थित होते. कचरा जिरविण्यासाठी विकेंद्रीकरण, तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कच-यावर प्रक्रिया करण्याबाबतचा आराखडा एक महिन्यात तयार करण्यात येईल असं आश्वासन यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.
तसंच तयार करण्यात आलेल्या आराखड्यामध्ये नागरिकांच्या सुचनांचा विचार करून बदल केले जातील असंही त्यांनी सांगितलं. ज्यांना तात्पुरत्या नोक-या दिल्यात त्यांना कायमस्वरूपी नोकरी दिली जाईल असं आश्वासनही देण्यात आलं. 22 दिवसांनंतर का होईना मुख्यमंत्र्यांनी हा प्रश्न सोडवला आहे असं सांगत खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांचं अभिनंदन केलं.
तर दुस-या बाजूला हे आंदोलन तात्पुरतं स्थगित केल्याचं ग्रामस्थांनी सांगितलंय. मुख्यमंत्र्यांनी तयार केलेल्या आराखड्यावर आक्षेप असेल तर आंदोलन पुन्हा करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय.