पुणे शिक्षण प्रसारक मंडळीने जागा परत करावी : पंडित

शिक्षण प्रसारक मंडळीच्या कारभाऱ्यांच्या करंट्या कारभाराचा आणखी एक नमुना म्हणजे, बाळ ज. पंडित कुटुंबियांनी केलेली केस. पुण्याच्या एस. पी. कॉलेजची २५ एकर जागा परत मिळावी, यासाठी पंडित कुटुंबीयांनी कोर्टात धाव घेतलीय. 

Updated: Jun 4, 2015, 03:24 PM IST
पुणे शिक्षण प्रसारक मंडळीने जागा परत करावी : पंडित title=

पुणे : शिक्षण प्रसारक मंडळीच्या कारभाऱ्यांच्या करंट्या कारभाराचा आणखी एक नमुना म्हणजे, बाळ ज. पंडित कुटुंबियांनी केलेली केस. पुण्याच्या एस. पी. कॉलेजची २५ एकर जागा परत मिळावी, यासाठी पंडित कुटुंबीयांनी कोर्टात धाव घेतलीय. 

जागेचा व्यावसायिक वापर आणि व्यवस्थापनाचा बेलगाम कारभार, याला कंटाळून पंडित कुटुंबीयांनी हे पाऊल उचललंय. शिक्षण प्रसारक मंडळीचं पुण्यातील प्रसिद्ध एस. पी. कॉलेज… एस. पी. कॉलेज उभं असलेली जागा बाळ ज. पंडित कुटुंबियांच्या मालकीची आहे. तब्बल २५ एकर एवढी ही जागा आणि तीही पुण्याच्या मध्यवर्ती भागात. 

शिक्षण प्रसारक मंडळीचं मुख्य कार्यालय देखील याच जागेवर उभं आहे. जगन्नाथ महाराज पंडित यांनी ९९ वर्षांच्या कराराने ही जागा, शिक्षण प्रसारक मंडळीला दिली. हा करार ३१ मे २०१७ रोजी संपतोय. मात्र त्याआधीच ही जागा परत मिळावी, यासाठी जगन्नाथ महाराज पंडित यांचे नातू सिद्धराज आणि अवधूत यांनी न्यायालयात दाखल केलाय. 

पंडित कुटुंबीयांनी जागा देताना काही अटी घातल्या होत्या. या अटींचं उल्लंघन झाल्यास जागा पुन्हा पंडित कुटुंबियांना मिळेल, अशी तरतूद त्यात आहे. या अटीनुसार, जागेचा वापर फक्त शैक्षणिक कार्यासाठी केला जावा, ही प्रमुख अट होती. मात्र ही अटच शिप्रच्या कारभाऱ्यांनी उघडउघड धाब्यावर बसवली. शैक्षणिक कामाव्यतिरिक्त इतर कारणांसाठी आणि त्यातही व्यावसायिक कारणासाठी जागेचा वापर केला जाऊ नये, अशी अट करारात आहे.

शिक्षण प्रसारक मंडळीच्या कारभाऱ्यांनी मात्र, ज्वेलरी शोपासून आयपीएलच्या पुणे टीमच्या नामकरण समारंभासाठी एस. पी. कॉलेजचं मैदान उपलब्ध करून दिलंय. विशेष म्हणजे पंडित कुटुंबीयांनी जागेच्या व्यावसायिक वापराची माहिती शिप्रच्या कारभाऱ्यांकडे मागितली असता, त्यांनी ती दिली नाही.
 
सिद्धराज आणि अवधूत पंडित यांनी जागा परत मिळवण्यासाठी कोर्टात दावा दाखल केलाय. तर त्यांचे वडील बाळ ज. पंडित हे सध्या संपूर्ण शिक्षण प्रसारक मंडळीचे अध्यक्ष आहेत, हे विशेष. अध्यक्ष असले तरी ते फक्त नामधारी आहेत आणि सर्व अधिकार नियामक मंडळाच्या अध्यक्षांकडे म्हणजेच अभय दाढे यांच्याकडे आहेत. आजारपणामुळे बाळ ज. पंडित हे सध्या अंथरुणाला खिळून आहेत. कोट्यवधी रुपयांची जमीन देऊन आणि संस्थेचं अध्यक्षपद असताना पंडित कुटुंबावर ही वेळ येत असेल तर, सामान्य पालकांना काय वागणूक मिळत असेल याची चर्चा सुरु आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.