अरूण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे : घरी येऊन ट्यूशन घेणा-या शिक्षकानेच मुलाचं अपहरण केल्याची घटना पुण्यात घडलीय. मुलाची सुखरूप सुटका झालीय.. शिक्षक फरार आहे. पुण्यात संपूर्ण रात्रभर हे थरारनाट्य सुरू होतं.
केवळ नशीब बलवत्तर म्हणून दिव्येश त्याच्या कुटुंबियांसोबत सुखरूप आहे. त्याच्या सोबत घडलेलं अपहरण नाट्य अंगावर शहारे आणणारं आहे.
प्रसन्न गुप्ता नावाचा दिव्येशचा शिक्षकच त्याचा अपहरणकर्ता होता हे धक्कादायक. आरोपी प्रसन्न रोज संध्याकाळी दिव्येशची घरातच शिकवणी घेत असे.
मंगळवारी ट्यूशन संपल्यावर वही आणण्यासाठी तो दिव्येशला वही आणण्याच्या बहाण्याने बाहेर घेऊन गेला. त्यानंतर स्वतःच्या झेन गाडीतून त्याने दिव्येशचं अपहरण केलं. दिव्येशच्या सुटकेसाठी गुप्ताने त्याच्या आईकडे 10 लाख रूपयांची मागणी केली.
दिव्येशच्या तपासासाठी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात टीम्स निर्माण करून शोधकार्य सुरू केलं. हे लक्षात आल्यावर प्रसन्नने दिव्येशला वाघोलीजवळ सोडून दिलं आणि तो पसार झाला.
आरोपी गुप्ताचे रेखाचित्र जारी करण्यात आले आहे. पीडित दिव्येशची सुखरूप सुटका झालीय हे महत्त्वाचे. ही घटना सर्वच पालकांना धडा देणारी आहे. घरी येणा-या शिक्षकाची संपूर्ण माहिती ठेवणं तसंच त्याची विश्वासार्हता पाहूनच त्याला नेमण्याची आवश्यकता आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.