नोकरी : पोलीस दलात 13 हजार पदांसाठी भरती

वर्ष 2014-15 साठी महाराष्ट्र पोलीस दलात जवळपास 13 हजार पदांसाठी भरती जाहीर करण्यात आलीय. येत्या पाच मेपासून या भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 1, 2014, 03:42 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
वर्ष 2014-15 साठी महाराष्ट्र पोलीस दलात जवळपास 13 हजार पदांसाठी भरती जाहीर करण्यात आलीय. येत्या पाच मेपासून या भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे. इच्छूक उमेदवारांसाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या भरतीसाठी ऑनलाईन फॉर्म भरता येणार आहे.
महाराष्ट्र पोलीस दलात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना 5 मेपासून सुरू होणारे ऑनलाईन अर्ज सर्वात प्रथम दाखल करावे लागतील. 25 मेपर्यंत तुम्ही हे ऑनलाईन अर्ज भरू शकणार आहात. तसेच 26 मेपर्यंत तुम्ही बँकेत चलन भरू शकता.
भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. ऑनलाइन अर्जाचा डेटा जमा करण्याचे काम ज्या कंपनीस देण्यात आले होते. त्या कंपनीचे सर्वर ऐनवेळी डाउन झाल्याने गोंधळ झाला होता. मात्र गेल्या वेळीची चूक पुन्हा होऊ नये म्हणून यावेळी खबरदारी घेण्यात आली आहे. ऑनलाइन डेटा जमा करण्यासाठी आधुनिक सर्वर तयार करण्यात आल्याची माहिती देखील पोलिसांना देण्यात आली आहे.
पोलीस भरती व अन्य महत्त्वाच्या विषयांसंबंधी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली वरिष्ठ पोलीस अधिका-यांची बैठक नुकतीच वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे झाली. या वेळी हा निर्णय घेण्यात आला. पोलीस बदल्यांच्या धोरणावरही बैठकीत चर्चा करण्यात आल्याची माहिती गृहमंत्र्यांनी दिली. केंद्र सरकारच्या वतीने सागरी सुरक्षेसाठी राज्यांमधील सुरक्षा यंत्रणांना प्रशिक्षण देण्यासाठी कोस्टल पोलिस ट्रेनिंग सेंटर सुरू करण्यात येणार आहे. या ट्रेनिंग सेंटरसाठी पालघरमधील तीन जागांचा प्रस्ताव केंद्राला पाठवण्यात आला आहे. या ट्रेनिंग सेंटरकरता ५० एकर जागा देण्याची तयारी दाखवण्यात आली अहे. हे ट्रेनिंग सेंटर अडीच हजार कर्मचारी क्षमतेचे असेल. या ट्रेनिंग सेंटरसाठी पाठपुरावा करण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी बैठकीत दिले.
विविध जागांचं विवरण खालीलप्रमाणे…
* मुंबई – 3400 जागा
* पुणे – 1342 जागा
* रायगड – 278 जागा
* सातारा – 212 जागा
* सांगली – 135 जागा
* ठाणे – 365 जागा
* ठाणे ग्रामीण – 134 जागा
* नवी मुंबई – 650 जागा
* गडचिरोली – 1600 जागा
* नागपूर – 403 जागा
* रत्नागिरी – 315 जागा
* हिंगोली 241 जागा
* बीड – 355 जागा
* एसआरपीएफ 1 – 65 जागा
* एसआरपीएफ ज्युनिअर 7 – 167 जागा

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.