पुणे : पीएमपीएमएलचे (पुणे परिवहन महामंडळ) नवनिर्वाचित अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी शनिवारी आणखी एक दे धक्का दिला. कामात निष्काळजी केलेल्या अधिकाऱ्याला घरचा रस्ताच दाखवला.
आपल्या पदाची सूत्रे हाती घेतल्याच्या पहिल्या दिवसापासूनच तुकाराम मुंढे यांनी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर शिस्तीचा बडगा दाखविण्याचा धडका लावला आहे. त्यामुळे परिवहन विभागातील अनेकजणांचे धाबे दणाणले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून मुंढे यांच्याकडून कामात हलगर्जी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे निलंबन सत्र सुरूच ठेवले आहे. याच निलंबन सत्राचा आणखी एक अंक शनिवारी पाहायला मिळाला. मुंढे यांनी पीएमपीएमएलचे भांडार अधिकारी चंद्रशेखर कदम यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.
परिवहन विभागाकडून बसेससाठी मागणी करण्यात आलेल्या सुट्या भागांचा पुरवठा योग्य वेळेत न केल्यामुळे चंद्रशेखर कदम यांच्याविरोधात कारवाई करताना त्यांच्यावर ठपका ठेवून त्यांना घरीच पाठवले.
दरम्यान, परिवहन विभागाच्या २०० ते २५० नादुरूस्त बसेस महिन्याभरात पुन्हा रस्त्यावर आणण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यानुसार भांडार विभागाकडे बसेसच्या सुट्या भागांची (स्पेअर पार्टस) मागणी करण्यात आली होती. मात्र, नियोजित वेळेत सुट्या भागांचा पुरवठा होऊ न शकल्यामुळे मुंढे यांनी भांडार अधिकारी चंद्रशेखर कदम यांना निलंबित केले.