पुण्यात जागा वाटपाचा तिढा निर्माण होण्याची शक्यता

पुण्यात भाजप सेनेमध्ये युतीची चर्चा सुरु होताच काँग्रेस - राष्ट्रवादीलादेखील आघाडीची गरज वाटू लागलीय. आघाडी करण्याबाबत दोन्ही बाजूंनी सकारात्मक विचार सुरु असून जागावाटपाचे प्रस्ताव परस्परांना देण्यात आले आहेत. मात्र सध्या त्यावरूनच तिढा निर्माण होण्याची देखील शक्यता आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jan 18, 2017, 10:49 PM IST
 पुण्यात जागा वाटपाचा तिढा निर्माण होण्याची शक्यता  title=

अरुण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे : पुण्यात भाजप सेनेमध्ये युतीची चर्चा सुरु होताच काँग्रेस - राष्ट्रवादीलादेखील आघाडीची गरज वाटू लागलीय. आघाडी करण्याबाबत दोन्ही बाजूंनी सकारात्मक विचार सुरु असून जागावाटपाचे प्रस्ताव परस्परांना देण्यात आले आहेत. मात्र सध्या त्यावरूनच तिढा निर्माण होण्याची देखील शक्यता आहे.

आजवर कितीही स्वबळाची भाषा केली असली तरी यावेळी युती किंवा आघाडीशिवाय पर्याय नसल्याची जाणीव आता सगळ्याच पक्षांना झालीय. भाजपला येनकेन प्रकारे पुण्याची सत्ता हवीय. त्यामुळे त्यांनी आधीच शिवसेनेसोबत मैत्रीचा हात पुढे केलाय. पुढे काय होईल ते माहित नाही, मात्र काँग्रेस - राष्ट्रवादीनं या मैत्रीला गांभीर्यानं घेतलंय. पुण्यातील सत्ता टिकवण्यासाठी दोन्ही पक्षांनी एकत्र आलंच पाहिजे या निर्णयाप्रत ते आलेत.

आघाडीबाबत शहरातील नेत्यांची अजित पवारांच्या मार्गदर्शनाखाली चर्चादेखील झालीय. काँग्रेसच्या प्रस्तावाला राष्ट्रवादीनं सकारात्मकपणे घेतलंय मात्र जागावाटपाच्या फार्मुला त्यांना मान्य नाही. पालिकेतील सध्याचं संख्याबळ, त्याचप्रमाणे गेल्या निवडणुकीत पराभव आलेल्या प्रभागांमधील मतदान लक्षात घेऊन राष्ट्रवादीनं काँग्रेसला फक्त 46 जागा देऊ केल्यात. उर्वरित 116 जागांवर राष्ट्रवादीनं दावा सांगितलाय. शहरात काँग्रेसच्या तुलनेत राष्ट्रवादीची ताकद वाढली असल्याचा त्यांचा दावा आहे.

पुणे महापालिकेवर गेली दहा वर्षे राष्ट्रवादीची सत्ता आहे. आजवर काँग्रेस, राष्ट्रवादीनं स्वतंत्र निवडणूक लढवलीय. निवडणुकींनंतर हे दोन्ही पक्ष एकत्र आलेत. यावेळी शहरातील राजकीय परिस्थिती बदललीय. काँग्रेस, राष्ट्रवादीचं नाही, तर भाजप, सेना, मनसे अशा कुठल्याच पक्षाकडे सर्व ठिकाणी देता येतील असे उमेदवार नाहीत. त्यामुळे सत्ता मिळ्वण्याबरोबरच प्रतिष्ठा त्याचप्रमाणे अस्तित्व टिकवायचे असेल तर मिळून लढण्याशिवाय पर्याय नाही. मात्र मैत्रीचं घॊडं जागावाटपावर अडण्याची शक्यता आहे.