रेल्वेत नोकरीचं आमिष दाखवून फसवणूक, तरुणीनं केला पर्दाफाश

काही दिवसांपूर्वी रेल्वे भरती घोटाळा गाजला. अनेकांनी त्यात घरदारं विकून पैसे भरले पण त्यात त्यांची फसवणूक झाली. असाच काहीसा प्रकार नव्यानं पिंपरी चिंचवडमध्ये झालाय. मात्र एका तरूणीच्या सतर्कतेनं ती फसली नाही.

Updated: Jun 11, 2015, 11:18 PM IST
रेल्वेत नोकरीचं आमिष दाखवून फसवणूक, तरुणीनं केला पर्दाफाश   title=

कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी-चिंचवड: काही दिवसांपूर्वी रेल्वे भरती घोटाळा गाजला. अनेकांनी त्यात घरदारं विकून पैसे भरले पण त्यात त्यांची फसवणूक झाली. असाच काहीसा प्रकार नव्यानं पिंपरी चिंचवडमध्ये झालाय. मात्र एका तरूणीच्या सतर्कतेनं ती फसली नाही.

रेल्वे मंत्रालयात नोकरीसाठी पैसे मागितल्याचा फोन पूजा मगर या तरुणीला आला. पण या तरूणीच्या सतर्कतेनं ती या प्रलोभनाला बळी पडली नाही. पिंपरी चिंचवडच्या पिंपळे सौदागर भागात राहणारी पूजा मगर... आर्थिक स्थिती बेताची असल्यामुळं शिक्षणासोबतच ती कामही करते. काही दिवसांपूर्वी एका वर्तमान पत्रात रेल्वेमध्ये ७३५ जागांसाठी नोकरी असल्याची जाहीरात पाहिली आणि सांगितलेल्या पत्त्यावर सर्व माहिती पाठवली. काही दिवसांतच तिला नियुक्तीपत्रही आलं. ती खूष होती. मात्र पत्र मिळाल्यावर तिला एक फोन आला. यावेळी तिच्याकडे पैशाची मागणी करण्यात आली. त्यानंतर पूजाला संशय आला. विशेष म्हणजे जे नियुक्ती पत्र तिला आलं त्यात भारतीय रेल्वे आणि राजमुद्रेचा वापरही करण्यात आलाय. लोकांना फसवताना राजमुद्रा आणि रेल्वेचा लोगोही वापर होतोय हे धक्कादायक आहे. 

पूजानं झी २४ तासशी संपर्क साधला. त्यानंतर नियुक्ती पत्रात दिलेल्या क्रमांकावर आम्ही पूजाला परत संपर्क करायला सांगितला. 08130026778 या क्रमांकावर पूजानं संपर्क केल्यावर परत तिला पलीकडच्या व्यक्तीने पैसे टाकण्यासाठी खातेक्रमांक सांगतो असं तरूणीला सांगितलं.

थोड्याशा सतर्कतेनं पूजा फसली नाही. पण अनेक तरूण नोकरीच्या गरजेपोटी अशा प्रकारांना बळी पडू शकतात. त्यांना सतर्क राहण्याचं आवाहन पूजा करत्ये.

तुमचं एटीएम ब्लॉक झालंय, तुमचा खातेक्रमांक द्या, तुमच्या खात्यातून आयकर खाते पैसे काढणार आहे असल्या भूलथापा देऊन गेल्या काही दिवसांत अनेकांना गंडा घालण्यात आलाय. आता तर थेट रेल्वे मंत्रालयात नियुक्तीचं पत्र देत लोकांना फसवण्यापर्यंत भामट्यांची मजल गेलीय. त्यामुळे तुम्ही सावधान रहा.. असल्या कोणत्याही प्रकाराला बळी पडू नका... रेल्वेत नोकरीसाठी रीतसर परीक्षा घेतली जाते, त्यात कुठेही कोणत्याही अकाऊंटमध्ये पैसे भरण्याची गरज नसते.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.