प्रताप नाईक, कोल्हापूर : मंदिर परिसरातील शौचालय पाडल्यानंतर शौचाला जायचं कुठं? असा प्रश्न भक्तांना पडलाय. हे शौचालय पाडून एक महिना पूर्ण होत अला तरी कोल्हापूर महानगरपालिका किंवा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं कोणतीच व्यवस्था केली नसल्यामुळं नागरिकांमधून संताप व्यक्त होतोय.
कोल्हापूरची महालक्ष्मी... साडेतीन शक्तीपिठांपैकी एक पीठ... दररोज हजारो भक्त देवीच्या दर्शनासाठी येतात... पण या भक्तांना प्राथमिक सुविधाच उपलब्ध नाही. ६ जून २०१६ ला शिवसैनिकांनी मंदिर परिसरातलं शौचालय पाडल्यानंतर भक्तांसाठी शौचालयाची सोयच उपलब्ध नाही... खरं तर कोल्हापूर महानगरपालिका आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं तत्काळ शौचालयाची उभारणी करणं गरजेच होतं. पण महिना उलटला तरी भाविकांच्या पदरात केवळ प्रतीक्षाच पडलीय.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं मंदिराबाहेर दोन मोबाईल शौचालय उभारण्याचा प्रयत्न केला... पण, मंदिर परिसरातल्या व्यापाऱ्यांनी त्याला विरोध केल्याचं देवस्थान समितीच्या सचिव शुभांगी साठे यांनी म्हटलंय.
वास्तविक पाहता पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं कोल्हापूर महानगरपालिकेशी संपर्क करुन शौचालयाचा प्रश्न तत्काळ मार्गी लागावा यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. पण या घटनेला महिना उलटूनही कुणाकडूनही कुठलेच प्रयत्न होताना दिसत नाही... त्यामुळं देवीच्या भक्तांचा वाली कोण? असा प्रश्न साहजिकच विचारला जातोय.