नागपूर : भाजप सरकारमधील मंत्री महादेव जानकरांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. यासाठी हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात त्यांनी याचिका दाखल केलीय. आपल्याविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्या विरोधात त्यांनी याचिका दाखल केली. देसाईगंज न्यायालयानं चौकशीसाठी बोलावल्याप्रकरणीही जानकरांनी याचिका दाखल केली. मात्र, न्यायालयाने यात हस्तक्षेप करण्यास नकार दिला.
देसाईगंज नगरपालिका निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर दबाव आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. त्यामुळे दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. या प्रकरणात दाखल झालेला गुन्हा रद्द करावा, अशई मागणी त्यांनी केली होती. गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज नगरपालिका निवडणुकीत जानकर हे निवडणूक अधिकाऱ्यावर दबाव आणत होते.
जानकर आणि निवडणूक अधिकाऱ्याचे मोबाईल संभाषण कॅमेऱ्यात कैद झाले होते. नगराध्यक्षपदासाठी तुमच्याकडे दोन अर्ज येतील. त्यातील एक अर्ज काँग्रेसचा असेल. तर दुसरा अपक्ष म्हणून असेल. त्यातील काँग्रेसचा अर्ज बाद करा. मोटवानी तुमच्याकडे अर्ज घेऊन येतील. त्यांना कपबशीचे चिन्ह द्या, अशा शब्दांमध्ये जानकर या व्हिडीओ क्लिपमध्ये बोलताना दिसत होते. याशिवाय मी दुग्धविकास मंत्री महादेव जानकर बोलतो आहे, असेदेखील जानकर या व्हिडीओमध्ये समोरच्याला सांगताना दिसत होते.