पाऊस गायब, राज्यावर दुष्काळाचं सावट

राज्याच्या कुठल्याही भागात सरासरीच्या निम्माही पाऊस पडलेला नाही. त्यामुळं राज्यावर दुष्काळाचं सावट पसरलंय. पाऊस कधी येणार याकडं बळीराजा डोळे लावून बसलाय.

Updated: Jun 26, 2014, 06:40 PM IST
पाऊस गायब, राज्यावर दुष्काळाचं सावट title=

मुंबई : राज्याच्या कुठल्याही भागात सरासरीच्या निम्माही पाऊस पडलेला नाही. त्यामुळं राज्यावर दुष्काळाचं सावट पसरलंय. पाऊस कधी येणार याकडं बळीराजा डोळे लावून बसलाय.

पावसाअभावी कोकणातलं भातशेतीचं गणित बिघडण्याची चिन्हं आहेत. इथं दुबार पेरणीची पाळी शेतक-यांवर येणाराय. पुणेकरांवर कधीही पाणी कपातीचं संकट ओढवू शकतं. कारण पुण्याला पाणी पुरवठा करणा-या धरणांमध्ये 15 जुलैपर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा आहे. सोलापुरातील उजनी धरणंही पार आटलंय. वरुणराजानं पाठ फिरवल्यामुळं मराठवाड्यात पेरण्या रखडल्या आहेत. मराठवाड्यात केवळ 20 टक्के एवढा पाणीसाठा सध्या उपलब्ध आहे. जायकवाडीतून 4 दिवसांआड पाणीपुरवठा सुरू आहे. आधी दुष्काळ, मग गारपीट आणि आता पुन्हा अस्मानी संकट मराठवाड्यावर ओढवलंय.

नाशिकमध्ये 15 ऑगस्टपर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा आहे. उत्तर महाराष्ट्रात पावसाअभावी खरीपाचा हंगाम वाया जाण्याची भीती व्यक्त केली जातेय. तर विदर्भात पाऊसच पडलेला नसल्यानं तापमान 39 अंशापर्यंत वाढलंय. शिवाय इथंही दुबार पेरणीचं संकट शेतक-यांवर कोसळले आहे.

आधी दुष्काळ....मग गारपिटीचा मार... आणि आता पावसाची दडी... मराठवाड्यावर वरुणराजा रुसलेलाच आहे.... जून महिना संपत आला तरी पावसाची चिन्हं नाहीत. त्यामुळं शेतकरी हवालदिल झालाय... बळीराजा हताश मनानं आता आभाळाकडे डोळे लावून बसलाय. यंदाही दुष्काळ पडतो की काय या भीतीनं पळशी गावच्या 80 वर्षांच्या ठगनाबाईंच्या काळजाचा ठोका चुकलाय. वरुणराजा बरसत नसल्यानं शेतीची कामं खोळबंलीयत. अजूनही शेतात पेरणीपूर्व मशागतीचीच काम सुरुयत. खरंतर यावेळेपर्यंत मराठवाड्यात पेरणीची कामं पूर्ण होतात. मात्र पावसानं दडी मारली... आणि बळीराजाची चिंता वाढू लागली. ठगनाबाईंचं कुटुंब शेतीवर अवलंबून आहे. त्यांचं संपूर्ण कुटुंब आकाशाकडे डोळे लावून बसलंय. विहिरी तळाला गेल्यायत. कर्जबाजारी होवून घरी बी-बियाणं आणून ठेवलंय. पाऊसच न बरसल्यानं बळीराजाच्या हाताला कामच नाही. मात्र तरीदेखील बळीराजानं आशावाद सोडलेला नाही.

दोन वर्षाआधीच मराठवाड्यानं भीषण दुष्काळ सोसलाय. गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाला. मात्र यंदा पुन्हा निसर्ग रूसलाय... त्यामुळे चिंताग्रस्त बळीराजाच्या तोंडी सध्या याच ओळी आहेत.
पड रं पाण्या, पड रं पाण्या, कर पाणी पाणी
शेत म्हाझं लयी तहानलंय, चातकावाणी !

 
शेतात काम नाही त्यामुळं बळीराजा सध्या कट्ट्यावर रमलाय. कट्ट्यांवर बळीराजा भविष्याचं काय होणार यावरच चर्चा करताना दिसतोय. जून संपत आला तरी पावसानं दडी मारल्यानं विदर्भातील शेतकरी चिंतेत आहेत. गेल्या वर्षी अतिवृष्टी आणि गारांनी विदर्भातील शेतक-यांची दाणादाण उडाली होती. यावर्षी किमान पाऊस तरी पडतो का याची चिंता शेतक-यांना भेडसावतेय..

तहानलेला विदर्भ वाट पहातोय तो पावसाची. इथल्या बळीराजाला चिंता आहे ती पाऊस कधी पडतो याची. जून महिन्याच्या सुरवातीला थोडा पाऊस पडला खरा पण नंतर जणू पाऊस गायबच झालाय..पाऊस येईल या आशेवर शेतक-यांनी पेरणीही केली पण नंतर पाऊस आलाच नाही. आता दुबार पेरणीचं संकट शेतक-यासमोर ऊभं राहिलयं.. पुन्हा पेरणी म्हणजे पुन्हा खर्च...आधीचा खर्च वाया गेला तो वेगळाच... पावसानं दांडी मारल्यानं शेतक-याचं आर्थिक गणित कोलमडलयं...बियाण्यांचा खर्च कसा करायया, गाय-बैलांकरता वैरणीची सोय कशी करायची अशा एक ना अनेक चिंता बळीराज्याला सतावताहेत..पाऊस नसल्यानं शेतक-याचं अवघं जीवनच संकटात सापडलयं.

हवामानातही बदल होताहेत. तापमान वाढतयं. यावेळी साधारण ३५ अंश सेल्सियस तापमान असतं. ते आता ३९ अंशांवर पोहोचलयं. सरासरी या काळात ११ सेंटीमिटर पावसाची नोंद होते पण यावर्षी फक्त ६ सेंटीमिटर पावसाची नोंद झालीय. 
म्हणजे यावर्षी सरासरीच्या निम्मा पाऊस विदर्भात झालाय.. विदर्भात सगळीकडे अशीच परिस्थिती आहे. बळीराज्याप्रमाणेच सगळा विदर्भच पावसाची वाट पहातोय..कधी एकदा पावसाचं शुभवर्तमान येतं याची सगळा विदर्भ चातकासारखा वाट पाहातोय. 

पावसाळा सुरु झालायं..मान्सूननं हजेरी लावलीयं पण नाशिक जिल्हात पाउस कुठेच दिसत नाही..ना शेतक-यांच्या शेतात पाणी आहे ना विहिरीत..ना पिकांना पाणी आहे ना ग्रामीण जनतेला पिण्यासाठी..२००९ नंतर यावर्षी आतापर्यंत सर्वात कमी म्हणजेच २६.२ मिलीमीटर पावसाची नोंद झालीय. पावसानं दडी मारल्यानं सांगली जिल्ह्यातल्या दुबार पेरणी करण्याचं संकट शेतक-यांसमोर आहे. जिल्ह्यातल्या 89 टक्के पेरण्या अजूनही अपूर्ण आहेत. शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर झाल्यानं यंदाही दुष्काळाची चिन्ह स्पष्टपणे दिसू लागलीत. 

सांगली जिल्ह्यात खरिपाचे क्षेत्र तीन लाख ९० हजार हेक्टर आहे. त्यातल्या केवळ 11 टक्के क्षेत्रात सध्या पेरणी झालीय. मे महिन्यात जिल्ह्यात पाऊस पडला . मात्र त्यानंतर पावसानं दडी मारलीय. या आठवडाभरात पाऊस न झाल्यास खरीप हंगाम वाया जाणार आहे, अजून 89 टक्के क्षेत्रावर पाऊस न झाल्यानं बळीराजाच्या काळजीत भर पडलीय. पावसाच्या अभावी ज्वारी, बाजरी, आणि भाताच्या पेरण्या टांगणीला लागल्यात. शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर झाल्यानं कोरड्या दुष्काळाच्या आठवणीनं सांगलीकर चिंताग्रस्त झालेत.

 
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.