सांगली : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा हादरा बसलाय. माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते अजितराव घोरपडे यांनी भाजपामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय.
तासगाव- कवठेमहांकाळ मतदारसंघातून गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याविरोधात अजितराव घोरपडेंनी आपली उमेदवारी जाहीर केलीय. त्यामुळे यावेळी गृहमंत्री आर. आर. =पाटील विरुद्ध अजितराव घोरपडे अशी झुंज सांगली जिल्ह्यात रंगणारेय.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अजितराव घोरपडे यांनी भाजपचे संजय काका पाटील यांचा उघड प्रचार केला होता. तासगाव कवठेमहांकाळ या मतदारसंघामधून भाजपच्या संजय पाटील याना ३८ हजारांचं मताधिक्य मिळालं होतं.
त्यामुळे अजितराव घोरपडे यांची उमेदवारीही आर.आर.पाटील आणि पर्यायानं राष्ट्रवादीसाठी डोकेदुखी ठरणारेय. अजितराव घोरपडे यांच्या प्रमाणंच जिल्ह्यातले राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते भाजपा आणि शिवसेनेच्या वाटेवर आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.