खेड पालिकेत रामदास कदमांची प्रतिष्ठा पणाला

नगरपालिकांचा रणसंग्राम खेड ही कोकणातली एकमेव नगर परिषद मनसेच्या ताब्यात आहे. याठिकाणी 17 पैकी 9 नगरसेवक मनसेचे आहेत. शिवसेनेचे 7 तर एक नगरसेवक राष्ट्रवादीचा आहे. 

Updated: Nov 23, 2016, 07:59 PM IST
खेड पालिकेत रामदास कदमांची प्रतिष्ठा पणाला  title=

प्रणव पोळेकर, खेड, रत्नागिरी : नगरपालिकांचा रणसंग्राम खेड ही कोकणातली एकमेव नगर परिषद मनसेच्या ताब्यात आहे. याठिकाणी 17 पैकी 9 नगरसेवक मनसेचे आहेत. शिवसेनेचे 7 तर एक नगरसेवक राष्ट्रवादीचा आहे. यंदाच्या निवडणुकी मनसे-राष्ट्रवादी यांनी शहर विकास आघाडीची स्थापना केलीय तर शिवसेना, भाजप आणि काँग्रेस हे तीनही पक्ष स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत... त्यामुळे यंदा मनसे याठिकाणी आपली जागा राखणार का? की पर्यावरणमंत्री रामदास कदम याचा मुलगा योगेश करिष्मा दाखवणार...

रत्नागिरी जिल्ह्यातली खेड नगरपरिषद एक संवेदनशील नगरपालिका म्हणून ओळखली जाते. राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचा हा तालुका... मात्र याच शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला 2006 सालच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं सुरुंग लावला आणि राष्ट्रवादीच्या साथीनं सत्ता संपादन केली. त्यानंतर 2011 मध्ये मनसेनं 17 पैकी 9 जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवली. यावेळच्या निवडणुकीत मनसे आणि राष्ट्रवादी एकत्र येत निवडणूक लढवतायत. वैभव खेडेकर यांच्यासह राष्ट्रवादीचे आमदार संजय कदम यांची प्रतिष्ठा याठिकाणी पणाला लागलीय.  

तर पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचा मुलगा योगेश कदम यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना खेड नगर परिषदेची निवडणूक लढवतेय. बिपिन पाटणे हे शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. युवा सेनेच्या माध्यमातून ही निवडणूक आम्हीच जिंकू असा विश्वास ते व्यक्त करतायत.  

काँग्रेस आणि भाजप देखील स्वबळावर मैदानात उतरले असल्यामुळे निवडणूक रंगतदार होणारेय. भाजपनं तर खेडमध्ये पहिल्यांदाच स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय. आता खेडचा मतदारराजा आघाडीच्या बाजूनं कौल देतो की अन्य कुणाला ते काही दिवसातच स्पष्ट होईल.