लोणावळा : गेल्या महिन्यापासून गायब झालेला वरुन राजा असा काही बरसला की दुष्काळाचे सावट काहीप्रमाणात दूर झाले तर काही ठिकाणी चांगलाच फटका बसला. मावळ येथे डोंगळारा भगदाड पडल्याने पावसाचे तुफान पाणी मुंबई - पुणे महामार्गावर आले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद होती. आता पावसाने थोडीशी विश्रांती घेतल्याने पावसाचे पाणी ओसले. त्यामुळे मुंबई-पुणे वाहतूक पूर्ववत सुरु झाली.
शुक्रवारी सकाळापासून मावळ मध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसाने अक्षरश: कहर केला. या पावसामुळे कामशेत ते वडगाव या दरम्यान मध्य रेल्वेच्या ट्रॅकवर पाणी आल्याने तसेच कान्हाफाटा येथे ट्रॅकखालील खडी वाहून गेल्याने मुंबईहून पुण्याकडे जाणारी डाऊन लाईनवरील रेल्वेची सेवा पूर्णपणे ठप्प झाली. तर मुंबईकडे जाणारी अप लाईन धिम्या गतीने चालू ठेवण्यात आली होती.
कामशेत येथे मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वहातूक पूर्णपणे ठप्प झाली होती. एक्स्प्रेस हायवेवर ओझर्डे ते बौर या दरम्यान तसेच कामशेत बोगदा व ताजे या गावाच्या दरम्यान डोंगरावरील पाणी मोठ़या प्रमाणात मार्गावर आल्याने या मार्गावरील वहातुकीला ब्रेक लागला होता. वहातूक धिम्या गतीने सुरु होती.
मावळ तालुक्यात लोणावऴयाजवळील वाकसई ते वडगाव या दरम्यान पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला. या भागातून वहाणारी इंद्रायणी नदी दुथडी भरून धोक्याच्या पातळीवरून वाहू लागल्याने या परिसरात सर्वत्र पूरपरिस्थीती निर्माण झाली होती. नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने नाने मावळ व आंदर मावळातील गावांना जोडणारे अनेक पुल पाण्याखाली गेल्याने या गावांचा संपर्क मुख्य भागाशी अनेक काळ तुटला.
सर्वप्रथम कामशेत गावाजवळील खामशेत तसेच नायगाव आणि साते येथे डोंगरावरील पाणी मोठ़या प्रमाणात मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर आल्याने हा महामार्ग पाण्याखाली गेल्याने हा मार्ग दुपारनंतर वहातुकीस बंद ठेवण्यात आला होता. तर मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवे वर ओझार्डे ते बौर व कामशेत बोगदा व ताजे या भागात डोंगरावरील पाणी मोठ़या प्रमाणात खाली येऊन एक्स्प्रेस हायवेनेच वाहू लागल्याने या मार्गावरील वहातूक चांगलीच मंदावली होती.
लोणावळा परीसरातील वाकसई, कार्ला, दहिवली, मळवली, शिलाटने या भागातही मोठ़या प्रमाणात पाणी भरल्याने या गावांना जोडणारे मार्ग तसेच येथील भातखाचरे मोठ़या प्रमाणात पाण्याखाली गेली. कार्ला एकविरा लेणीवरील धबधबा ही ओसंडून वाहू लागल्याने या धबधब्यासोबत अनेक दगड खाली आल्याने येथे दरड कोसळल्याची अफवा पसरली होती. लेणीकडे जाणारा पायऱ्यांच्या मार्गावरून मोठ़या प्रमाणात पाणी खाली वाहत होते. लेनीवर देवीच्या दर्शनाला गेलेले अनेक पर्यटक तसेच भाविक यामुळे वरच अडकून पडले होते. गावकऱयांच्या मदतीने त्यांना खाली आणण्यात आले.
मावळात कोसळलेल्या या मुसळधार पावसामुळे नाने मावळ व आंदरमावळातील धरणांच्या पाणीसाठ़यात मोठ़या प्रमाणात वाढ झाली असून वडीवळे धरण शंभर टक्के भरले. पवण मावळात पाण्याचा जोर उर्वरीत मावळच्या माणाने कमी राहिला असला तरी बौर ते ओझर्डे या भागात चांगला पाऊस बरसला. कामशेत मार्ग पवना नगरकडे जाणाऱया मार्गावर बौर घाटात दरड कोसळल्याने या मार्गावरील वहातूक खंडीत झाली होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.