मनसे आमदार वसंत गितेंची राज ठाकरेंच्या बैठकीला दांडी

राज्यात मनसेची पायाभरणी करणाऱ्या नाशिक मनसेतील नाराजीनाट्याचा दुसरा अंक सुरु झालाय. स्थायी समिती निवडीवरुन सुरु झालेल्या या नाट्यात, आता राज ठाकरेंनी घेतलेल्या बैठकीला मनसे आमदार वसंत गिते गैरहजर राहिले आहेत. तसंच मनसेच्या 40 पैकी 20 नगरसेवकांनीही या बैठकीकडे पाठ फिरवली आहे. 

Updated: Jul 6, 2014, 07:43 PM IST
मनसे आमदार वसंत गितेंची राज ठाकरेंच्या बैठकीला दांडी title=

नाशिक: राज्यात मनसेची पायाभरणी करणाऱ्या नाशिक मनसेतील नाराजीनाट्याचा दुसरा अंक सुरु झालाय. स्थायी समिती निवडीवरुन सुरु झालेल्या या नाट्यात, आता राज ठाकरेंनी घेतलेल्या बैठकीला मनसे आमदार वसंत गिते गैरहजर राहिले आहेत. तसंच मनसेच्या 40 पैकी 20 नगरसेवकांनीही या बैठकीकडे पाठ फिरवली आहे. 

सरचिटणीस अतुल चांडक आणि जिल्हाध्यक्ष सचिन ठाकरे यांनीही हा बैठकीला दांडी मारलीय. त्यामुळं राजकीय चर्चांना उधाण आलंय. स्थायी समितीच्या सभापतीपदावरून प्रदेश सरचिटणीस वसंत गिते सध्या नाराज आहेत. भाजपाला दिलेला शब्द टाळून मनसेच्या राहुल ढिकले यांना सभापती केल्यानं पक्षात सरळसरळ दोन गट पडलेत.

लोकसभा निवडणुकीत मनसे उमेदवाराचा झालेला दारूण पराभव लक्षात घेता राज ठाकरे पदाधिकाऱ्यांबाबत नाराज होते. लोकांपर्यंत कामं पोहोचत नाहीत म्हणून गेल्या काही काळापासून वसंत गिते यांना निर्णय प्रक्रियेपासून दूर ठेवण्यात येत होते. स्वतः अभ्यंकर हे मुंबईतून येऊन सूत्रे हलवत असल्यामुळं गिते यांनी नाराजी प्रकट केलीय. 

त्यामुळे राज ठाकरे तातडीनं नाशिकमध्ये दाखल झालेत. विधानसभा आणि महापौर निवड तोंडावर असताना गटबाजी उफाळून आल्यास मनसेला अडचण निर्माण होऊ शकते.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.