विदर्भाचा सुपुत्र मराठवाड्याला न्याय देणार?

औरंगाबादमध्ये तब्बल आठ वर्षाच्या प्रतीक्षेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्यात मंत्रिमंडळ बैठक घेण्याची घोषणा केली होती. मराठवाड्यातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी ही बैठक महत्त्वाची होती. मात्र, बैठकीला मुहूर्त काही मिळत नसल्याने बैठक होणार का नाही याबाबतच आता संभ्रम निर्माण झालाय.

Updated: Oct 14, 2015, 01:33 PM IST
विदर्भाचा सुपुत्र मराठवाड्याला न्याय देणार? title=

विशाल करोळे, औरंगाबाद : औरंगाबादमध्ये तब्बल आठ वर्षाच्या प्रतीक्षेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्यात मंत्रिमंडळ बैठक घेण्याची घोषणा केली होती. मराठवाड्यातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी ही बैठक महत्त्वाची होती. मात्र, बैठकीला मुहूर्त काही मिळत नसल्याने बैठक होणार का नाही याबाबतच आता संभ्रम निर्माण झालाय.

मराठवाड्यातील सततच्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी केलेली ही घोषणा आता हवेतच विरल्याचं सध्यातरी दिसतंय. मराठवाड्यात गेली तीन वर्ष भीषण दुष्काळाच तांडव सुरु आहे. राज्यातील आणि केंद्रातील अनेक मंत्र्यांनी, विरोधी पक्षांच्या नेत्यांनी दुष्काळ दौरे करत बळीराजाला मदतीच आश्वासन दिलं. अखेर हे प्रश्न सोडवण्यासाठी  मराठवाड्यात खास मंत्रिमंडळ बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या अनेक मागण्या पूर्ण होतील, अशी आशा होती मात्र आता बैठकच दिसत नाही तर मागण्या तरी पूर्ण होणार का? असा प्रश्न या निमित्तानं पुढं येतोय. 

पाहूयात काही प्रमुख मागण्या
- जायकवाडीच्या पाणीप्रश्नाबाबत तातडीनं निर्णय घेणे
- दुष्काळामुळं खरीप वाया गेल्यानं कोट्यवधींचं नुकसान झालयं. त्यात तातडीनं आर्थिक मदत देण्याची गरज आहे याचा निर्णय घेणे
- मराठवाड्यातील दुष्काळग्रस्तांना कर्जमुक्ती 
- शेतकऱ्यांकडून होणारी कर्ज वसुली तत्काळ थांबवणे... 
- आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीचे निकष बदलणे 
- जलसिंचनाचे अपूर्ण प्रकल्प पूर्ण करणे 

या आणि अशा अनेक मागण्या मंजूर व्हाव्यात, अशी इच्छा शेतकऱ्यांची आहे. मात्र, कदाचित सरकारला हे तातडीनं करणं शक्य नाही त्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीची फक्त तारीख पे तारीख हा प्रकार सुरु आहे... बैठक तातडीनं होणं गरजेचं असल्याचं मत ज्येष्ठ पत्रकार सुशील कुळकर्णी यांनी व्यक्त केलंय. 

तसं तर मंत्रिमंडळ बैठक 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या दिवशी घेणे अपेक्षित होतं. मात्र, याच दिवशी गणेश उत्सवाला सुरुवात झाली. त्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीला पितृपक्ष आणि नवरात्र यामुळे काही मुहूर्त लागला नाही. मात्र, तरी सुद्धा ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी बैठक होईल, असं आश्वासन भाजपा आमदार देत आहेत. 

याआधी काँग्रेस सरकारच्या काळात अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना 2008 मध्ये शेवटची बैठक मराठवाड्यात पार पडली होती. त्यामुळे आठ वर्षांनी होणाऱ्या या बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष असताना फडणवीस सरकार फक्त तारीख पे तारीख देत मराठवाड्याच्या जनतेला झुलवत ठेवत आहे.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.