लातूर : जिल्ह्यातील मांजरा नदी काठच्या गावात अजूनही काही पूरस्थिती कायम आहे.
काल निलंगा तालुक्यातील कर्नाटक सीमेवर असलेल्या हालसी तुगाव या गावाला मांजरा नदीच्या पाण्याने वेढा दिला होता. मात्र एनडीआरएफच्या पथकाने बोटीच्या माध्यमातून जवळपास १०० हून अधिक नागरिकांना सुखरुप बाहेर काढले.
या नागरिकांना गावातीलच देवीच्या मंदिरात ठेवण्यात आलं होते. दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने बऱ्याच अंशी पुरस्थिती आता ओसरली आहे. मांजरा धरणातील पाण्याची आवकही मंदावली आहे. पण पुन्हा आवक वाढली तर पूरस्थिती पुन्हा एकदा पूरस्थिती निर्माण होण्याची भीती आहे.
माकणी येथील निम्न तेरणा धरण १०० टक्के भरत आलंय. त्यामुळे या धरणाचे दरवाजे उघडण्याची शक्यता आहे. परिणामी तेरणा नदीकाठच्या औसा आणि निलंगा तालुक्यातील गावांना पुन्हा एकदा पुराचा धोका होऊ शकतो. त्यामुळे तेरणा नदीकाठच्या ग्रामस्थांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.