घोटी, नाशिक : घरातील वृद्ध महिलांमुळेच सुख समाधान मिळत नाही, पैसाअडका टिकत नाही म्हणून जन्मदात्या आईसह दोन वृद्ध महिलांचा बळी देण्याचा अघोरी प्रकार नाशिक जिल्ह्यात उघड झालाय. त्र्यंबकेश्वर तालुक्यातल्या टाकेहर्ष या आदिवासी गावात ही दुर्दैवी घटना घडलीय. पोलिसांनी याप्रकरणी महिला मांत्रिकासह नऊ जणांना अटक केलीय.
नाशिक जिल्ह्यातल्या घोटी इथल्या नरबळी प्रकरणानं सर्वांनाच धक्का बसलाय. काशीनाथ आणि गोविंद दोरे या दोघा भावांनी बच्चीबाई खडके ऊर्फ घोडा या मांत्रिक महिलेच्या नादी लागून आपल्या आईचा बुधाबाईचा बळी दिला. बळी देण्याआधी बुधाबाईच्या नग्न शरीरावर नाचून तिचे हाल हाल करण्यात आले. इतकंच नाही तर या नराधम मुलांनी तिचे डोळेही फोडले... मांत्रिक महिलेची सासूबाई काशीबाई वीर हिलाही हाल हाल करून ठार मारण्यात आलं. हा प्रकार पाहिल्यानंतर त्यांची बहिण राहीबाई हिनं नग्नावस्थेतच तिथून पळ काढला आणि कसाबसा आपला जीव वाचवला. याप्रकरणी नाशिक पोलिसांनी आता नऊ जणांना अटक केलीय.
विशेष म्हणजे, दिवाळीनंतर 28 ऑक्टोबरला ही अघोरी घटना घढली. या घटनेनंतर मोखाडा पोलिसांत जाऊन राहीबाईनं तक्रारही केली. मात्रं ठाणे पोलिसांनी त्याकडं साफ दुर्लक्ष केलं. महिला मांत्रिकाला आपलं सामर्थ्य वाढवण्यासाठी आणि मंदिर उभारणीसाठी एकूण सात बळी द्यायचे होते. त्यापैकीच हे दोन बळी देण्यात आले होते. या प्रकरणाचा छडा लागला असला तरी अजून किती बळी गेले आहेत हे शोधण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे, अशी माहिती नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी दिलीय.
राज्यात जादूटोणा प्रतिबंधक कायदा लागू होऊन वर्ष झालं तरी या कायद्याचा म्हणावा तसा धाक निर्माण झालेला नाही. विशेषतः नाशिक जिल्ह्यातच या कायद्याखाली सर्वाधिक गुन्हे नोंद झालेत. त्यातच आता हा नरबळीचा प्रकार उघड झाल्यानं आदिवासींवर अंधश्रद्धेचाच पगडा किती जास्त आहे, ते पुन्हा एकदा स्पष्ट झालंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.