मुंबई : ऐन गणपतीच्या तोंडावर कोकण रेल्वेचा प्रचंड खोळंबा झालाय. त्यामुळे गणेशोत्सवासाठी घराकडे निघालेल्या कोकणवासियांचे अतोनात हाल होतायत. त्यातच सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने कोकण रेल्वे मार्गावरील प्रवास कटकटीचा झालाय. आज अनेक गाड्या पाच ते सहा तास उशिरा धावत अाहेत. जनशताब्दी एक्सप्रेस ठाणे स्थानकात दोन तास रोखून धरण्यात आली होती.
दोन दिवसांपूर्वी मालगाडी घसरल्यामुळे विस्कळीत झालेली कोकण रेल्वे ताळ्यावर येते न येते तोच सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड झालाय. त्यामुळे अनेक गाड्या वेगवेगळ्या स्थानकांवर अडकून पडल्यात. आज रवाना होणा-या दिवा सावंतवाडी पॅसेंजर, सावंतवाडी मडगाव पॅसेंजर, मडगाव सावंतवाडी पॅसेंजर या गाड्या रद्द करण्यात आल्यात. अनेक गाड्या 7-8 तास उशिरानं धावत असल्यामुळे कोकणवासियांचे अतोनात हाल सुरू आहेत.
त्यातच जागोजागी स्थानकांवर अडकून पडलेल्या प्रवाशांना कोणतीही माहिती देण्यात येत नसल्यामुळे या हालांमध्ये अधिकच भर पडलीये. स्टेशन मास्तरनाही नीट माहिती नसल्याची तक्रार काही प्रवाशांनी केली आहे. यामुळे गोंधळ अधिकच वाढलाय. दरम्यान, कोकणात जाणा-या प्रवाशांची प्रचंड गर्दी मुंबईतल्या स्थानकांवर आहे. त्यामुळे ठाणे स्थानकात जनशताब्दी एक्सप्रेस रोखून धरण्यात आली होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.