रत्नागिरी : एका मिसिंग केसमुळं खेड पोलीस चांगलेच अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण प्रवीण सकपाळ नावाचा तरूण गेल्या जून महिन्यापासून बेपत्ता झालाय.
खेड तालुक्यातील भरणे येथे राहणारा प्रवीण सकपाळ २४ जून २०१६ रोजी खेड येथून अचानक गायब झाला. प्रवीणच्या पत्नीनं प्रवीण गायब झाल्याची तक्रार खेड पोलीस स्थानकात दिली.
यामागं घातपात असावा, अशी शंका प्रवीणचे वडील सखाराम सकपाळ यांनी खेड पोलिसांकडे व्यक्त केली होती. पण प्रवीणचा शोध काही लागला नाही.
दरम्यान, आठवडाभरानंतर भरणे इथल्या स्मशानात एक प्रेत वरती आल्याचं काही ग्रामस्थांनी सांगितलं. पण ते प्रेत पोलिसांनी परस्पर गाडून टाकलं. प्रवीणच्या वडिलांनी ते प्रेत पुन्हा बाहेर काढण्यासाठी तहसीलदारांना अर्ज केला. त्यानुसार प्रेत बाहेर काढलं असता अंगावरील कपडे आणि चपलांवरून हा मृतदेह प्रवीणचाच असल्याचं स्पष्ट झालं.
प्रवीणचं चार वर्षांपूर्वी लग्न झालं होतं.. त्याची पत्नी आणि प्रवीणचं पटत नव्हतं. त्यामुळंच भरणे इथं त्यानं एक सदनिका देखील घेतली होती.. यामागं घातपात असल्याचं प्रवीणचे वडील ओरडून सांगत होते. पण खेड पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्यानं घेतलं नाही, असा आरोप नातेवाईकही करतायत.
पोलिसांच्या या बेपर्वाईविरोधात आता दलित संघटनांनीही आवाज बुलंद केलाय.
प्रवीणचा मृतदेह ज्या साडीत गुंडाळलेला होता ती साडी प्रवीणच्या सासूची असल्याचं प्रवीणच्या वडिलांचं म्हणणं आहे... आता या प्रकरणाचा छडा लावण्याचं आव्हान खेड पोलिसांपुढं आहे.