अरुण मेहेत्रे, पुणे : पुण्यामध्ये कुठलंही काम वादाशिवाय पूर्ण होत नाही असं म्हणतात. शहरातल्या मुठा नदी पात्रात बांधण्यात येत असलेल्या जॉगिंग ट्रॅकमुळे, पुन्हा एकदा हा समज पक्का झालाय.
मुलांना खेळण्यासाठी, पेन्शनरांना बसण्यासाठी आणि स्वास्थ्यप्रेमींना व्यायामासाठी... असा एक जॉगिंग ट्रॅक मुठा नदीच्या कडेला म्हणजेच बऱ्यापैकी नदीच्या पात्रात बांधला जात आहे. कसब्याचे आमदार आणि पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या आमदार निधीतून हा जॉगिंग ट्रॅक बांधण्यात येत आहे. अर्थात हा मतदारसंघही गिरीश बापट यांचाच आहे. मात्र बापट मतदारसंघासाठी करत असलेलं हे काम, शहरातल्या राज्यसभेच्या खासदार वंदना चव्हाण यांना मान्य नाही. कारण या जॉगिंग ट्रॅकमुळे नदीच्या पर्यावरणाला हानी पोचणार असल्याचा त्यांचा दावा आहे.
पालकमंत्री गिरीश बापट यांनी मात्र हा दावा साफ खोडून काढलाय. विशेष म्हणजे काँग्रेस पक्षाचे स्थानिक पुढारी या कामी बापट यांच्या पाठीशी उभे राहिलेत पर्यावरण आणि विकास यांचा समतोल राखला गेलाच पाहिजे. मात्र त्यासाठी राजकारण बाजूला ठेवणं गरजेचं आहे. नाही तर जॉगिंगचा हा ट्रॅक वादाचा ट्रॅक होऊन राहील.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.