पुणे : सहकारमंत्री हर्षवर्धन पाटलांवर केलेला हल्ला पूर्वनियोजित असल्याचा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलाय. एखाद्या मंत्र्यांवर अशाप्रकारे शाई फेकणं निंदनीय असल्याची टीकाही अजित पवारांनी पिंपरी-चिंचवडमध्ये केलीय. धनगर समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन करत असलेल्या कार्यकर्त्यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावर केमिकल फेकले. यात त्यांच्या डोळ्याचा गंभीर दुखापत झाली आहे.
इंदापूरच्या भिगवणमध्ये संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यावर शाईसारखं दिसणारं निळ्या रंगाचं केमिकल फेकण्याचा प्रकार घडला. आरक्षणाच्या मुद्यावरून धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी केमिकल फेकण्याचं हे अघोरी कृत्य केलंय. जेंटियन व्हायलेट नावाचं हे बुरशीनाशक केमिकल हर्षवर्धन पाटील यांच्या डोळ्यात फेकण्यात आलं. त्यामुळं त्यांच्या डाव्या डोळ्याला गंभीर दुखापत झालीय. त्यांच्यावर सध्या पुण्याच्या रूबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.
शाईसारखं केमिकल फेकणा-या धनगर समाजाच्या तिघा कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या प्रकारामुळं इंदापूरचे काँग्रेस कार्यकर्ते संतप्त झाले असून त्यांनी ठिकठिकाणी रास्ता रोको सुरू केलाय. दरम्यान, हर्षवर्धन पाटील यांना धनगर समाजाच्या आंदोलकांनी २८ जुलैला इंदापूरमध्ये घेराव घातला होता. तर आज थेट त्यांच्यावर केमिकलयुक्त शाई फेकली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.