इंदापूर : वारीच्या वेळी शहरात साठलेल्या कचऱ्याचा वास येऊ नये, यासाठी इंदापूर नगरपालिकेनं अफलातून आयडियाची कल्पना लढवली. त्यांची ही शक्कल समजल्यानंतर इंदापूर पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या अकलेचे कौतुक करावे तरी कसे, असा प्रश्न तुम्हालाही पडेल.
जगदगुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी दरवर्षी इंदापूरमार्गे पंढरपूरला जाते. मात्र इंदापूरला कचऱ्याचे ढीग आणि घाणीचं साम्राज्य यामुळं वारकऱ्यांना नाक मुठीत धरूनच वाट काढावी लागते. यावरून पालखी सोहळा प्रमुख व इंदापूर प्रशासन यांच्यात नेहमीच वाद पेटतो. त्यावर प्रशासनानं यंदाच्या वर्षी नामी तोडगा शोधला. तो म्हणजे कच-याच्या दुर्गंधीचा वास येऊ नये, यासाठी कच-याच्या ढिगांवर चक्क अत्तर फवारण्यात आले. देशातच काय, जगात कुठेही घडणार नाही, अशी ही कच-यावर अत्तर फवारण्याची उठाठेव इंदापूर नगरपालिकेनं केली.
मात्र या तात्पुरत्या मलमपट्टीवर पालखी सोहळ्याचे विश्वस्त अभिजीत मोर यांनी नाराजीच व्यक्त केलीय. प्रशासनाने वेळीच या गंभीर बाबीकडं लक्ष देऊन, कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज आहे. त्यासाठी पंढरीचा विठुराया इंदापूर पालिका अधिकाऱ्यांना सद्बुद्धी देवो, हीच अपेक्षा...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.