जुन्नर, पुणे : उन्हाच्या झळा सहन करताना थंडगार पाणी प्यायलं तर बरं वाटतं. पण दरवेळी पाणी कोण बरोबर घेऊन बाहेर पडणार. १५ ते २० रुपयांत पाण्याची बाटली मिळते, ती घेतली की झालं. पण ते पाणी शुद्ध आहे, पिण्यालायक आहे, हे तुम्ही खात्रीनं सांगू शकाल का? हे वाचल्यावर आणि पाहिल्यावर नाहीच, असे उत्तर येईल.
सध्या कडक उन आहे. उन्हाच्या काहिलीत तहान भागवण्यासाठी बाटलीबंद पाणी आपण सगळेच विकत घेतो. मात्र हे पाणी नेमकं येतं कुठून ते तुम्हाला माहित आहे का, नाही? पाहा तुम्ही पित असलेलं पाणी कुठून येतं ते. इथं नळावर पाणी भरून ते बॉक्समध्ये भरण्यात येते. कुठल्याही मोरीचा नळ, बोअरवेल किंवा अगदी एखादा फुटका पाईप अशा कुठल्याही ठिकाणी भरलेलं हे पाणी असू शकतं. किन्ले, बिस्लेरी, ऑक्झिरिच, बेली यासारख्या ब्रँड्सच्या बाटल्या, लेबल आणि बॉक्स बनवून हे दूषित पाणी त्यात भरलं जातं. मग बेमालूमपणे त्या बाटल्या सील होतात आणि ग्राहकांच्या हाती पडतात.
कदाचित तुम्ही जे पाणी विकत घेताय, ते अशाच एखाद्या अस्वच्छ ठिकाणी भरलेलं तर नसेल ना? होय, बाटलीबंद पाणी असेच भरले जात आहे. हा प्रकार किती गचाळ आहे. मात्र, कंपनीतील पाणी हे इथं कोणत्याही मानवी स्पर्शाशिवाय बाटल्या भरल्या जातात. बाटली तयार होण्यापासून तिचं झाकण सिल होईपर्यंत प्रत्येक गोष्ट ऑटोमॅटिक होते. कामगारांना काटेकोर बंधनं पाळावी लागतात.
हे प्लँट उभारताना ४० ते ५० लाख खर्च केलेले असतात. या पद्धतीनं १ लीटरची बाटली तयार करण्यासाठी १२ रुपये खर्च येतो. मात्र अनधिकृत विक्रेते कमी किमतीमध्ये पाणी विकतात. सरकारचं आणि प्रशासनाचं यावर कोणतंच नियंत्रण नसल्याची तक्रार उद्योजक करतायत. याबाबत उद्योजक दत्ता भरने आणि वॉटर बॉ़टल असोसिएशनचे अध्यक्ष विजय डुबल यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
पण प्रश्न फक्त या अधिकृत उद्योजकांचा नाही. प्रश्न आहे सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याचा. त्यामुळेच बाबूंच्या आशीर्वादानं सुरू असलेला हा गोरखधंदा बंद होणं आवश्यक आहे. या प्रकारांना आळा घालण्यासाठी एखादी मोठी दुर्घटना व्हायची वाट सरकार बघत आहे का, असा प्रश्न उपस्थित होतोय.