हेल्मेट डोक्यात घातलं तरच सुरु होणार तुमची बाईक...

दुचाकीस्वारांनो, तुम्हाला जर अपघात टाळायचा असेल किंवा तुमची गाडी चोरी जाण्यापासून वाचवायची असेल तर मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे.

Updated: Jan 20, 2015, 08:14 PM IST
हेल्मेट डोक्यात घातलं तरच सुरु होणार तुमची बाईक...  title=

पुणे : दुचाकीस्वारांनो, तुम्हाला जर अपघात टाळायचा असेल किंवा तुमची गाडी चोरी जाण्यापासून वाचवायची असेल तर मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे.

रस्त्यावर होणाऱ्या अपघातांचं वाढतं प्रमाण आणि त्यामध्ये दुचाकीस्वारांचे होणारे मृत्यू सध्या सर्वांचाच चिंतेचा विषय बनलाय. दुचाकीस्वारांचे अपघात रोखण्यासाठी इंदापूरमधल्या विद्यार्थ्यांनी तयार केलंय एक खास हेल्मेट...

हे खास हेल्मेट बनवलंय इंदापूरच्या एस.बी. पाटील तंत्रनिकेतन कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांनी... इंजीनिअरिंगच्या तृतीय वर्षात शिकणाऱ्या चार विद्यार्थ्यांनी ट्रान्समीटर आणि रिसीव्हरच्या सहाय्यानं एक यंत्र तयार केलंय आणि ते हेल्मेटमध्ये बसवलंय. जर हे हेल्मेट आपल्या डोक्यात असेल तरच गाडी सुरू होते. तसंच गाडी सुरू असताना हेल्मेट काढलं तर गाडी लगेचच बंद होते.

हे उपकरण अतिशय छोटं असून ते बसवण्यासाठीही फारच कमी जागा लागते. विशेष म्हणजे, याचा खर्चही कमी आहे. आता या यंत्राचं पेटंट मिळवण्यासाठी कॉलेज प्रशासन प्रयत्नशील आहे, अशी माहिती एस बी पाटील पॉलिटेक्निकचे प्राचार्य मिलिंद कुलकर्णी यांनी दिलीय. 

अनेकदा दुचाकीस्वारांचा मृत्यू प्रामुख्यानं डोक्यास मार लागल्यानं होतो... ते टाळता यावं यासाठी या विद्यार्थ्यांनी तयार केलेलं उपकरण निश्चितच कौतुकास्पद आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.