हिंद केसरी 'सर्जा'च्या जाण्याने शोककळा, अंत्यसंस्कारासाठी अख्खं गाव लोटलं

खेड तालुक्यातल्या गुळाणी गावावर सध्या शोककळा पसरलीय. कारण एकाचा झालेला आकस्मिक मृत्यू... तो कोण होता आणि त्याच्या अंत्यसंस्कारासाठी अख्खं गाव का लोटलं होतं, हा खास रिपोर्ट. 

Updated: Nov 5, 2015, 12:12 PM IST
हिंद केसरी 'सर्जा'च्या जाण्याने शोककळा, अंत्यसंस्कारासाठी अख्खं गाव लोटलं title=

जुन्नर, पुणे : खेड तालुक्यातल्या गुळाणी गावावर सध्या शोककळा पसरलीय. कारण एकाचा झालेला आकस्मिक मृत्यू... तो कोण होता आणि त्याच्या अंत्यसंस्कारासाठी अख्खं गाव का लोटलं होतं, हा खास रिपोर्ट. 

हाथी मेरे साथी सिनेमात राजेश खन्नावर जी वेळ आली, तोच दुःखद प्रसंग खेडच्या चंद्रकांत पिंगळेंच्या वाट्याला आलाय. ज्याला मुलाच्या मायेनं वाढवलं, तो लाडका सर्जा बैल जग सोडून गेल्यानं त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. सर्जाच्या अंत्यसंस्कारासाठी अख्खं गुळाणी गाव इंद्रायणी नदीकाठी जमलं होतं. 

एका बैलासाठी अख्खं गाव शोकाकूल होण्याचं कारण म्हणजे तो साधासुधा बैल नव्हता. तर तो होता हिंदकेसरी. आतापर्यंत प्रत्येक बैलगाडा शर्यत जिंकणाऱ्या या सर्जाला महाराष्ट्राचा 'हिंद केसरी' पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. त्यामुळं त्याला निरोप देताना  सर्वांच्याच डोळ्यात अश्रू आणि चेह-यावर दुःखाचं सावट होतं.

दहा वर्षांपूर्वी सर्जा या बैलाला पिंगळेंनी पंढरपूर येथून २५ हजार रुपये किमतीला विकत आणलं. बैलगाडा शर्यतीत उतरवलं. सर्जानंही धन्याचा विश्वास सार्थ करून दाखवला आणि प्रत्येक शर्यतीत बाजी मारली. सर्जाला विकत घेण्याचा प्रयत्न अनेक बैलगाडा शौकिनांनी केला. पण सर्जा आता कुटुंबातला एक सदस्य बनला होता.

काही दिवसांपूर्वी सर्जाला पॅरेलिसीसचा आजार झाल्यानंतर पिंगळे कुटुंबानं पाण्यासारखा पैसा खर्च केला. पण दुर्दैवानं त्यांच्या धडपडीला यश आलं नाही. सर्जा त्यांना कायमचा सोडून गेला. मुक्या प्राण्यांवर माणसांसारखं प्रेम करायचं, एवढंच नाही तर त्यांच्या मृत्यूनंतर धार्मिक रीतीरीवाजाप्रमाणं अंत्यसंस्कार करायचे, हे फक्त शेतकऱ्याच्याच घरात घडू शकतं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.