चंद्रपूरातल्या पावसानं घेतले चार बळी

चंद्रपूर जिल्ह्यात २ दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने रविवारी ४ बळी घेतले. 

Updated: Jul 10, 2016, 11:31 PM IST
चंद्रपूरातल्या पावसानं घेतले चार बळी  title=

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात २ दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने रविवारी ४ बळी घेतले. बल्लारपूर तालुक्यातील किन्ही नाल्याला आलेल्या पुरात इंडिगो वाहून गेल्याने चौघा शिक्षकांना जलसमाधी मिळाली. चंद्रपूर जिल्ह्यातील कोठारी इथल्या उमा माहेश्वरी या कॉन्व्हेन्ट शाळेतले हे चौघेजण होते. बल्लारपूर कोठारी मार्गावर असलेल्या किन्ही नाला इथे शनिवारी संध्याकळी ही दुर्घटना घडली. 

चंद्रपूर जिल्ह्याच्या आपत्ती निवारण चमूने तातडीनं मृतदेह शोधासाठी अभियान राबवलं. पोलिसांनी या मार्गावरील २ प्रमुख शहरातील सीसीटीव्ही नोंदी तपासल्या मात्र हाती अपयश आले. रविवारी सकाळी पुलावरील पाणी कमी झाल्यावर इंडिका गाडी नजरेस पडली यानंतर शोधकार्य सुरू झाले. 

इंडिका गाडीला बाहेर काढून आत बेपत्ता व्यक्तींचा शोध घेतला गेला. मात्र त्यात कुणीही आढळून आले नाही. अखेर  सुमारे ५ किलोमीटर पुढे पळसगाव शिवाराच्या परिसरात दोघांचे मृतदेह पथकाला सापडले. सध्या या नाला परिसरात बोटीच्या सहाय्याने अधिक शोधकार्य सुरू आहे.  

हा नाला पुढे जाऊन वर्धा नदीत मिसळतो तर वर्धा नदी सुमारे ३० किमी पुढे प्राणहिता नदीला मिळते. या सर्वच नद्या पुराच्या पाण्याने तुफान वाहत असून याही परिस्थितीत शोधकार्य सुरू आहे.