पुणे : हिवताप नियंत्रण कार्यालयातील औषधे रुग्णांना वितरित न करता त्यांची विल्हेवाट लावली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
येरवडा परिसरात जिल्हा हिवताप नियंत्रण कार्यालय आहे. त्यात आवारात एका खोलीत मोठ्या प्रमाणावर औषधांचा साठा आहे. काही कर्मचारी त्यातील औषधी नष्ट करत असल्याचं तिथल्या काही नागरिकांनी पाहिले.
औषधांच्या पाकिटातील गोळ्या पाण्यात विरघळवल्या जात होत्या. तर त्यांचे रॅपर्स जाळण्यात येत होते. हा संपूर्ण प्रकार संशयास्पद असल्यानं यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार देण्यात आलीय.
दरम्यान ही औषधे पावसामुळे खराब झाल्यामुळं ती नष्ट करण्यात येत असल्याचं हिवताप कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सांगितलं. असं असलं तरी सरकारी औषधांची साठवणूक तसेच अशा पद्धतीनं लावण्यात येत असलेली विल्हेवाट या दोन्हीसमोर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.