परीक्षा देताना विद्यार्थिनीचा मृत्यू, ट्रकच्या धडकेत दोन विद्यार्थी ठार

धुळे शहरात परीक्षा देताना एका विद्यार्थिनीचा मृत्यू झालाय.  तर बुलडाणा येथे अपघातात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.

Updated: Mar 1, 2016, 09:18 AM IST
परीक्षा देताना विद्यार्थिनीचा मृत्यू, ट्रकच्या धडकेत दोन विद्यार्थी ठार title=

धुळे : शहरात परीक्षा देताना एका विद्यार्थिनीचा मृत्यू झालाय. साबिला बानो मुश्ताक अहेमद असं या विद्यार्थिनीचं नाव असून ती शहरातील नॅशनल उर्दू शाळेत बारावी विज्ञान शाखेत शिकत होती.

पेपर लिहित असताना अचानक साबीला हिला भोवळ आली आणि ती बेंचवरुन खाली पडली. ही बाब पर्यवेक्षकांच्या लक्ष्यात आल्यानंतर त्यांनी तातडीनं डॉक्टरांना आणि तिच्या नातेवाईकांना बोलावलं. त्यानंतर तीला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.

अचानक रक्तदाब कमी झाल्यानं तिचा मृत्यू झाला. तिला यापूर्वीही चक्कर येण्याचा त्रास होत असल्याची माहिती समोर आली आहे.

बुलडाणा येथे अपघातात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

बारावीचा पेपर देऊन घरी परतत असतांना विद्यार्थ्यांच्या दुचाकीला ट्रकने  धडक दिल्याने दोन विद्यार्थांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगावराजा जवळ घडली. 

बारावीचा रसायनशास्त्राचा पेपर सोडवून रोहणा येथील ​नितिन मनोहर सवडे आणि किसन देवीदास डोके हे दोघे मित्र दुचाकीवर घरी परत जात असताना नागपूर पुणे महामार्गावर समर्थ कृषी विद्यालयाजवळ समोरून येणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जबरदस्त धडक दिली. यामध्ये दोघेही जागीच ठार झाले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून रोहणा गावावर शोककळा पसरली आहे.