पुन्हा एकदा समुद्रात झेपावण्यासाठी नौका सज्ज

कोकणात आजपासून मासेमारीला सुरुवात होतेय. यंदापासून मासेमारीला १ ऑगस्टपासून सुरुवात होतेय...त्यामुळे समुद्र किनाऱ्यांवर मच्छिमार बांधवांची लगबग पहायला मिळतेय. 

Updated: Aug 1, 2015, 10:57 AM IST
पुन्हा एकदा समुद्रात झेपावण्यासाठी नौका सज्ज title=

रत्नागिरी : कोकणात आजपासून मासेमारीला सुरुवात होतेय. यंदापासून मासेमारीला १ ऑगस्टपासून सुरुवात होतेय...त्यामुळे समुद्र किनाऱ्यांवर मच्छिमार बांधवांची लगबग पहायला मिळतेय. 

समुद्र किनाऱ्यावर विसावलेल्या मच्छिमारी नौका पुन्हा एकदा समुद्रात झेपावण्यासाठी सज्ज झाल्यात. त्यासाठीच किनारपट्टीवर मच्छिमार बांधवांची अशी लगबग सुरू आहे. दोन महिन्यांच्या बंदीच्या कालावधीत नौकांची डागडूजी पूर्ण झाली असून सर्वच नौका किनाऱ्यावर आणल्या गेल्यात. १ ऑगस्टपासून पुन्हा एकदा नव्या जोमानं मासेमारीला सुरुवात होईल. 

खरं तर दरवर्षी राज्यात १५ ऑगस्ट किंवा नारळी पौर्णिमेपैकी जो दिवस आधी येईल त्यादिवशी मासेमारीवरची बंदी उठवली जायची. पण इतर राज्यातली बंदी १ ऑगस्टला उठवतात. त्यामुळे बाहेरचे मच्छिमार याठिकाणी येऊन व्यवसायाला सुरुवात करायचे. त्यामुळे इथल्या मच्छिमारांचं नुकसान व्हायचं. पण, यंदापासून देशभरातल्या सर्वच किनारपट्टी भागातल्या बंदी कालावधीत सुसूत्रता आणण्यासाठी प्रशासनाकडून १ जून ते ३१ जुलै असा बंदी कालावधी ठरवण्यात आलाय.

मासेप्रेमींची सुरमई, प्रॉन्झ, पापलेट, बांगडा, घोळ माशांना सर्वाधिक पसंती मिळते. या व्यवसायातून दर महिन्याला तीनशे कोटींची तर वर्षभरात चार हजार कोटींची उलाढाल होते. वादळी वारे, सततचा अवकाळी पाऊस यामुळे गेल्या हंगामात मच्छिमारी बांधवाना अनेक संकटांना सामोरं जावं लागलं होतं. पण यंदा तरी निसर्ग साथ देईल आणि हा हंगाम चांगला जाईल, अशी अपेक्षा मच्छिमार व्यक्त करत आहेत. 
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.