कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे : प्रवाशांच्या आंदोलनासमोर झुकून मध्य रेल्वेने दिवा स्टेशनवर सकाळी आणि संध्याकाळी काही फास्ट गाड्यांना दिव्याला हॉल्ट दिला खरा... पण यातून काय साध्य झालं असा सवाल उपस्थित होतोय. प्रवाशांची सोय झाली की प्रवाशांचे जीव धोक्यात घातले गेले याचं उत्तर द्यावं लागणार आहे.
मध्य रेल्वेवर असलेलं हे दिवा स्टेशन... कोकण रेल्वेला मध्य रेल्वेशी जोडणारं हे जंक्शन... इथे गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात वस्ती वाढली... वाढलेल्या लोकसंख्येच्या आकांक्षा वाढल्या आणि फास्ट ट्रेनच्या मागणीसाठी गेल्यावर्षी दिवावासियांनी आंदोलनही केलं. त्यानंतर अनेक चर्चा झाल्यावर अखेर रविवारपासून रेल्वेने काही फास्ट गाड्यांना दिव्यात हॉल्ट दिला.
दिवावासियांचं तेवढ्यापुरतं समाधान झालं असलं तरी गाड्या थांबायला लागल्यावर गर्दीचा बडगाही दिसायला लागलाय. डोंबिवलीवरूनच खच्चून भरून आलेल्या गाडीच्या फूटबोर्डावरही पाय ठेवायला जागा नसल्याने काही जणांनी जीव धोक्यात टाकत ट्रॅकवरून उलट्या बाजूने गाडीत चढायला सुरूवात केलीय.
सकाळी 9 वाजून 9 मिनिटांनी दिव्यात थांबणाऱ्या गाडीत उलट्या बाजूने चढणाऱ्या प्रवाशांचा व्हीडीओ झी 24 तासच्या हाती लागलाय. उलट्या बाजूने चढणाऱ्यांची संख्याही जास्त असल्याने एकमेकांना ढकलत गाडीत चढायचे प्रयत्न सुरू झाले. प्रवाशांचे जीव किती धोक्यात आहेत हे हा व्हीडीओ पाहून लक्षात येईल.
दिव्यात फास्ट ट्रेनला थांबा दिल्याने काही प्रश्न उपस्थित झालेत.
अवघ्या 5 ते 10 हजार प्रवाशांसाठी जलद थांबा का सुरू केला?
दिव्यात 95 टक्के इमारती अनधिकृत आहेत, त्यातच रेल्वेने फास्ट गाड्या थांबवायला सुरूवात केल्याने अनधिकृत इमारती आणखी फोफावणार का
फास्ट गाड्यांना थांबा देण्यापूर्वी रेल्वेने प्रवाशांच्या जीवाचा विचार केला होता का? असे प्रश्न विचारले जात आहेत.
त्यामुळे फास्ट गाड्या थांबवण्याऐवजी गाड्यांच्या फेऱ्या वाढवून अर्ध जलद लोकल्सची संख्या वाढवता आली असती तर प्रवाशांच्या सोयीचं ठरलं असतं असा सूर आळवला जातोय.