‘माशी स्पर्श' झाला आणि एका महिलेला मिळालं पद!

पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील सातकरस्थळ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत चक्क एका माशीनं मतदानाचा हक्क बजावलाय. होय, एका माशीनं मतदान केल्यामुळेच संजीवनी थिगळे या महिलेची उपसरपंचपदी निवड झालीय. 

Updated: Jul 1, 2014, 11:42 PM IST
‘माशी स्पर्श' झाला आणि एका महिलेला मिळालं पद!  title=

पुणे : पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील सातकरस्थळ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत चक्क एका माशीनं मतदानाचा हक्क बजावलाय. होय, एका माशीनं मतदान केल्यामुळेच संजीवनी थिगळे या महिलेची उपसरपंचपदी निवड झालीय. 

मक्खी सिनेमात या डिजिटल माशीचा फाडू परफॉर्मन्स आपण पाहिला... एक माशी एका व्हिलनला कशी भारी पडते, हे सिनेमात दाखवलं गेलं... सध्या पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील सातकरस्थळ गावात अशीच एक माशी गाजतेय. सुमारे साडे पाच हजार लोकसंख्येचं हे गाव... पण गावच्या सरपंच-उपसरपंचाच्या निवडीसाठी इथं निवडणूक होत नाही किंवा मतदानही होत नाही... या गावानं आपली एक वेगळीच लोकशाही परंपरा सुरू केलीय.

सरपंच-उप सरपंचाची निवड करायची झाली की, गावचं ग्रामदैवत असलेल्या भैरवनाथ मंदिरात सगळेजण जमतात. इच्छुक सदस्यांच्या नावाच्या चिठ्ठ्या मंदिरात ठेवल्या जातात. यापैंकी ज्या चिठ्ठीवर पहिल्यांदा माशी बसेल, त्याला सरपंच-उपसरपंचपदी काम करण्याची संधी मिळते. उपसरपंच देवदास सातकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानं ही जागा रिक्त झाली होती. गेल्या शनिवारी भैरवनाथ मंदिरात उपसरपंच निवडीची अशीच प्रक्रिया पार पडली. माशीनं चिठ्ठीला स्पर्श केला आणि संजीवनी थिगळे यांना उपसरपंच बनण्याचा बहुमान मिळाला.  

लोकशाहीला झालेला हा ‘माशी स्पर्श’ सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनलाय. ग्रामपंचायत निवडणुकीतही हल्ली एकमेकांचे सदस्य पळवणे, रूपयांचे आमीष देऊन मतदान करण्यास भाग पाडणे, असे प्रकार घडतात. हे वाद टाळण्यासाठी गावकऱ्यांनी माशी-स्पर्शाचा हा अनोखा फंडा स्वीकारलाय.

माशी शिंकणं म्हणजे एखाद्या कामात विघ्न येणं, असं मानलं जातं... पण लोकशाहीच्या नावानं चालणारा घोडेबाजार टाळण्यासाठी आणि ग्रामपंचायत निवडणुकीत होणारा हजारो-लाखो रुपयांचा खर्च वाचवण्यासाठी ग्रामस्थांनी हा माशी-स्पर्शाचा पर्याय निवडला असेल, तर त्यात नवल ते काय असंच म्हणावं लागेल.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.