भूखंड खरेदीसाठी खडसेंनी पाच कोटी कुठून आणले?

पुण्यातल्या भोसरी इथल्या एमआयडीसी जमिनीचा वाद आता एकनाथ खडसेंच्या संपत्तीपर्यंत आलाय. कारण, या वादग्रस्त जमीन खरेदी प्रकरणी खडसेंच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय. 

Updated: Apr 11, 2017, 09:42 PM IST
भूखंड खरेदीसाठी खडसेंनी पाच कोटी कुठून आणले? title=

नितीन पाटणकर, पुणे : पुण्यातल्या भोसरी इथल्या एमआयडीसी जमिनीचा वाद आता एकनाथ खडसेंच्या संपत्तीपर्यंत आलाय. कारण, या वादग्रस्त जमीन खरेदी प्रकरणी खडसेंच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय. 

माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांच्या नावे भोसरीतील एमआयडीसीचा वादग्रस्त भूखंड २०१६ मध्ये खरेदी करण्यात आला. तीन एकराच्या या भूखंडाची बाजार भावानं किंमत होती ३२ कोटी रुपये... पण खडसेंनी ३ कोटी ७५ लाख रुपयात ती जमीन विकत घेतली. मुद्रांक शुल्क मात्र ३१ कोटी २५ लाख रुपये किमतीवर भरण्यात आलं. 

हा भूखंड अब्बास उकानी नावाच्या व्यक्तीकडून खरेदी करण्यात आला. उकानी या भूखंडाचे मूळ मालक असल्याचा दावा खडसेंकडून करण्यात येतोय. मात्र, हा भूखंड एमआयडीसीचा असून, खडसेंनी पदाचा गैरवापर करून तो बळकावल्याचा आरोप याचिकाकर्ते हेमंत गावंडे यांनी केलाय.

हायकोर्टाच्या आदेशानुसार आता याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. ३० वर्षांपासून एमआयडीसीच्या ताब्यात असलेला भूखंड खरेदी करण्यामागचा खडसेंचा हेतू काय होता? याचा तपास आता बंडगार्डन पोलीस करणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार खडसेंवर गुन्हा दाखल झालाय. जमीन खरेदीसाठी खडसेंनी पाच कोटी रुपये कुठून आणले याची चौकशी होणाराय. या प्रकरणी त्यांच्या संपत्तीचीदेखील चौकशी होऊ शकते.

झोटिंग समितीची चौकशी, हायकोर्टातली याचिका आणि त्यानंतर आता एसीबी चौकशीचा ससेमिरा खडसेंच्या मागे लागलाय. त्यामुळं त्यांचं राजकीय पुनर्वसन होण्याची शक्यता आणखी लांबलीय, एवढं नक्की...