मुंबई : शिवाजी महाराजांची आठ नवी पत्रे प्रकाशित झाली आहेत, यात शिवाजी महाराजांशी संबंधित इतिहासातील महत्वाच्या गोष्टींचा समावेश आहे.
सह्याद्री इतिहास संशोधन केंद्राच्या वतीने छत्रपती शिवाजीमहाराजांच्या अप्रकाशित आठ पत्रांचा शोध घेतला आहे.
महत्वाचं म्हणजे, शिवाजीमहाराजांच्या आग्रा भेटीचा सुटकेचा प्रसंग, विशाळगड किल्ल्याच्या हवालदाराचे दुधोजी अहिरराव यांना गडकोटांच्या कारभाराबद्दलच्या माहितीसह अन्य पत्रांचा समावेश आहे.
छत्रपतींच्या या पत्रांमुळे इतिहास संशोधकांना एक इतिहासाचा खजिना प्राप्त झाल्याचा दावा इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी केलाय.
औरंगजेबाच्या कैदेतून सुटल्यानंतर ३ ऑक्टोबर १६६६ पर्यंत म्हणजे ४७ दिवस मथुरेतच होते हे सिद्ध होते. त्यामुळे महाराज निसटून २२ दिवसांत राजगडावर परतले हा इतिहास संशोधकांचा दावा चुकीचा ठरत आहे, असे या वेळी सावंत म्हणाले.
३ ऑक्टोबर १६६६च्या पत्रामधे शिवाजीमहाराजांनी मथुरेतील जयकृष्ण चौबे या मथुरावासी पुजाऱ्यांना वर्षांसन दिले आहे. हा कागद महाराजांनी मथुरेतच ३ ऑक्टोबर १६६६ रोजी लिहून दिला आणि पुढे ५ मार्च १६६७ रोजी या कागदावर 'मर्यादेय विराजिते'चे मोर्तब करून दिले.
या पत्रामुळे शिवाजीमहाराज औरंगजेबाच्या कैदेतून सुटल्यानंतर ३ ऑक्टोबर १६६६ पर्यंत म्हणजे ४७ दिवस मथुरेतच होते हे सिद्ध होते. त्यामुळे महाराज निसटून २२ दिवसांत राजगडावर परतले हा इतिहास संशोधकांचा दावा चुकीचा ठरत आहे.
महाराज ४ महिन्यांनी २० नोव्हेंबर १६६६ रोजी स्वराज्यात आले या प्रमेयाला बळकटी मिळत आहे. आढळून आलेल्या प्रत्येक पत्रांमधून अनेक नवनवीन माहिती समोर येत आहे. अशाप्रकारची आणखी पत्रे असून, याचा शोध संस्था घेत असल्याचे इंद्रजित सावंत यांनी सांगितले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.