कर्जसाठी बनावट फायनान्स कंपनी, नवी मुंबईत आंतरराज्य टोळी अटकेत

बनावट फायनान्स कंपन्यांच्या माध्यमातून कर्ज मिळवून देण्याची जाहिरातबाजी करुन शेकडो लोकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला जात आहे. अशाप्रकारच्या आंतरराज्य टोळीला नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं अटक केली.

Updated: Oct 13, 2016, 07:43 PM IST
कर्जसाठी बनावट फायनान्स कंपनी, नवी मुंबईत आंतरराज्य टोळी अटकेत title=

नवी मुंबई : बनावट फायनान्स कंपन्यांच्या माध्यमातून कर्ज मिळवून देण्याची जाहिरातबाजी करुन शेकडो लोकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला जात आहे. अशाप्रकारच्या आंतरराज्य टोळीला नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं अटक केली.

नवी मुंबई पोलिसांनी एका आंतरराज्य टोळीला अटक केलीय. त्यांच्याकडून साडे आठ लाख रूपयांची रोख रक्कम आणि 7 मोबाईल फोन जप्त करण्यात आलेत. महाराष्ट्रासह दिल्ली, उत्तरप्रदेश, राजस्थान, हिमाचल प्रदेश, आंध्र प्रदेश आदी विविध राज्यातील 500 हून अधिक लोकांची या टोळीनं फसवणूक केली आहे.

या टोळीत मुख्य आरोपी सुभाष मोहन चड्डा, चिराग अरोरासह एजंट पौर्णिमा साळवे आणि अमोल निर्वाणी या चौघांचा समावेश आहे. विठाई, माऊली, मंगलमूर्ती यासारख्या बनावट फायनान्स कंपन्याच्या नावाने ही टोळी मोठमोठ्या वर्तमानपत्रात जाहिरात देत असे. कमी व्याजदर, नो गॅरेन्टर, कमी कालावधीत होमलोन, पर्सनल लोन, एज्युकेशन लोन, व्यावसायिक लोन, मिळवून देण्याचं आमीष दाखवण्यात येत असे.

या जाहिरातीला भुलून एखादी व्यक्ती कर्ज घेण्यासाठी तयार झाल्यानंतर विविध सबबी सांगून त्याच्याकडून 50 हजारांपर्यंत रक्कम उकळली जायची. अशाच पद्धतीने कल्याणच्या एका व्यावसायिकाकडून टोळीने 35 हजार रूपये गोळा केले. मात्र कर्ज न मिळाल्याने त्या व्यावसायिकाने नेरुळ पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली.

या प्रकरणाचा तपास करताना पौर्णिमा साळवे आणि अमोल निर्वाणी हे दोघे एजंट आधी पोलिसांच्या हाती लागले. मुख्य आरोपी सुभाषमोहन चड्डा आणि त्याचा साथीदार चिराग अरोरा याला दिल्लीतून अटक करण्यात आली. चड्डानं गेल्या 10 वर्षात विविध राज्यात वेगवेगळे एजंट तयार केल्याचं उघडकीस आले.

चड्डानं गेल्या दीड महिन्यामध्ये महाराष्ट्रातील मुंबईसह, नवी मुंबई, ठाणे, पुणे लातुर, अहमदनगर, नांदेड, रत्नागिरी, व कोल्हापूर भागातील 35 लोकांना अशाच प्रकारे फसवल्याचं उघडकीस आलंय. अशा नागरिकांनी नवी मुंबई गुन्हे शाखेकडं संपर्क साधावा, असं आवाहन पोलिसांनी केले आहे.