मुंबई : भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १२४ वी जयंती. १४ एप्रिल १८९१ रोजी मध्य प्रदेशातल्या महू या गावी डॉ. आंबेडकरांचा जन्म झाला. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत त्यांनी उच्च शिक्षण पूर्ण केलं.. समाजातील जातीभेदाचे उच्चाटन करुन त्यांनी सामाजिक न्याय प्रस्थापित केला.
तळागाळातील लोकांना बौद्धिक आणि सामाजिक गुलामगिरीतून मुक्त करुन समानतेचा मंत्र देणारे दीपस्तंभ म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर... गरीबी, निरक्षरता ही गुलामगिरीची मूळ कारणं असल्यानं शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा मंत्र त्यांनी दिला. देशाची घटना लिहून त्यांनी प्रत्येकाला मतदानाचा हक्क मिळवून दिला.. अशा या महामानवाला झी २४ तासचाही सलाम.
गुगल डुडलचा खास सलाम
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२४ व्या जयंतीनिमित्त सा-या देशभरातून विनम्र अभिवादन करण्यात येतंय.. गुगलनंही आपल्या होमपेजवर डॉ. आंबेडकरांना गुगल डुडलच्या माध्यमातून खास सलाम केलाय. पाच हजार वर्षांपासून अमानुष, लाचारीचे जीवन जगणार्या जनमानसात आत्मसन्मानाची आणि अस्मितेची ज्योत पेटवणा-या महामानवाला हा अनोखा सलाम म्हणावा लागेल.
ठाण्यात रात्री जयंतीचा सोहळा
ठाण्यात रात्री बाराच्या ठोक्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा सोहळा पाहायला मिळाला. ठाण्यातल्या कोर्टनाका परिसरातल्या पुतळ्याजवळ हजारो भीमसैनिक जमा झाले.. यांत डोंबिवली, कल्याण, मुलुंड, भांडुप परिसरातील नागरिका्ंचाही समावेश होता.. यावेळी डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन बुद्धवंदना म्हणण्यात आली.
देशभरात आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जात असताना पुण्यातील अजिंक्य भीमज्योत सेवा संघ यांच्या वतीनं अभिनव उपक्रम राबवला जातोय.. मंडळाच्या वतीने डॉ. आंबेडकरांचं अकरा फूटी शाडूच्या मातीचं शिल्प साकारण्यात आलंय. मूर्तीकार प्रमोद कांबळे यांनी एका दिवसात हे शिल्प साकारलंय.. ७५ किलो माती आणि लोखंडी बारच्या माध्यमातून हे शिल्प साकारण्यात आलंय. याआधी मूर्तीकार कांबळे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे शिल्प एका दिवसात साकारलं होतं.
७५ वर्षीय आजीची परीक्षा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त पुणे आयुक्तालयाच्यावतीने घेण्यात आलेल्या प्रज्ञा शोध परीक्षेत ७५ वर्षीय परीक्षार्थी असलेल्या आजींनी सा-यांचं लक्ष वेधून घेतलं. तरुणांसह रुक्मिणी कांबळे यांनीही ही परीक्षा दिली.. जुन्या शिक्षण पद्धतीमध्ये अकरावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या या आजींना संसारामुळं पुढं शिक्षण पूर्ण करता आलं नाही.. मात्र पुणे आयुक्तालयाच्यावतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत सहभाग घेऊन हम भी किसीसे कम नहीं हेच दाखवून दिलं.. या वयात लिहताना हात कापत असले तरी आजींनी एक तासाचा पेपर लिहला आणि चक्क दहा मिनिटे आधी तो पूर्ण केला.. पुणे पोलिसांनी आजीबाईंचं विशेष बक्षीस देऊन कौतुकही केलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.