पुणे: एका गुन्हेगारीविषयी सध्या सुरू असलेल्या एका मालिकेतून आयडिया घेऊन मामीनं भाच्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. वारजे इथल्या आदित्य गार्डनसिटीच्या पाठीमागे असलेल्या 'म्हाडा'च्या इमारतीवरील पाण्याच्या टाकीत बुधवारी रात्री भाच्याचा संशयास्पद मृत्यू झाला होता.
थॅलेसमियानं आजारी असलेल्या साडेचार वर्षाच्या भाच्याचा सांभाळ करावा लागत असल्याच्या रागातून, मामीनंच त्याचा पाण्याच्या टाकीत ढकलून खून केल्याचं उघडकीस आलंय. श्रेयस किरण गायकवाड असं मृत मुलाचं नाव असून श्रेयसच्या अल्पवयीन मामीला वारजे पोलिसांनी अटक केली. तिनं श्रेयसला बुधवारी दुपारी टेरेसवर पाणी दाखवण्यासाठी नेलं होतं. त्याला पाण्यात पाय सोडून बसायला लावलं आणि पाठीमागून ढकललं. श्रेयस तिला पाण्यातून बाहेर काढण्यासाठी विनवणी करत असतानाही, या निर्दयी मामीनं पाण्याच्या टाकीचं झाकण लावून बंद केलं आणि निघून गेल्याची माहिती वारजे पोलिसांनी दिलीय.
गायकवाड कुटुंबीय सातव्या मजल्यावर तर श्रेयसची मामी चौथ्या मजल्यावर राहते. श्रेयस हा थॅलेसमियानं आजारी होता. त्याच्याकडे त्याच्या आईचं बिलकुल लक्ष नव्हतं. त्याचा सांभाळ त्याची आजी (मामाजी आई) करत होती. त्यामुळं या अल्पवयीन मामीला श्रेयसला सांभाळण्यासाठी कष्ट घ्यावे लागत होते. गर्भवती असलेली ही मामी श्रेयसवर वैतागलेली होती. तिनं श्रेयसला मारण्याचा यापूर्वीही प्रयत्न केला होता.
दरम्यान, टिव्हीवर गुन्हेगारीबाबत सुरू असलेल्या मालिकेमध्ये पाण्याच्या टाकीत बुडवून मारण्याचा प्रकार या मामीनं पाहिला होता. या सीरिअलमुळं तिला श्रेयसला मारण्याची कल्पना सुचली. श्रेयसला दुपारी सांभाळावं लागतं. त्यात त्याचं घर सातव्या मजल्यावर होतं. लगेचच टेरेस आणि पाण्याची टाकी असल्यानं कोणाला काही कळणार नाही, या कल्पनेनं हत्येचा कट रचला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.