विशाल करोळे, औरंगाबाद : रोटी बँकेच्या यशानंतर आता औरंगाबादमध्ये गरजूंसाठी एक आगळीवेगळी कपडा बँक उघडण्यात आली आहे.
औरंगाबादमधल्या या कपडा बँकेमध्ये, प्रत्येक गरजू माणसाला पूर्णपणे मोफत कपडे वाटण्यात येतात. औरंगाबादच्या एका सामाजिक संस्थेनं गरजूंसाठी ही खास बँक सुरु केली आहे.
या बँकेत तुम्ही वापरात नसलेले कपडे जमा करायचे. अगदी जुने मात्र न फाटलेले कपडेसुद्धा ही बँक स्विकारते. त्यानंतर बँकच ते कपडे स्वच्छ धुऊन, ड्राय क्लीन करुन शिवाय इस्त्री करुन, नव्या कपड्याप्रमाणेच व्यवस्थित पॅक करते. त्यानंतर कपडे मागण्यासाठी येणाऱ्या कुठल्याही गरजूला त्याच्या मापानुसार हे कपडे देण्यात येतात. ६ महिन्यांच्या बाळावासून ते ६० वर्षांच्या वृद्धापर्यंतच्या व्यक्तींना, या बँकेकडून कपडे पुरवले जातात.
ज्यांच्या अंगावर कपडे नाही ज्यांच्याजवळ कपड्यांसाठी पैसै नाही अशा गरिबांना ही कपड्याची बँक म्हणजे मोठा आधार ठरली आहे. घरचे उपयोगात नसलेले कपडे या ठिकाणी दिल्यामुळे गरीबांना ते मिळतात त्यामुळे आनंद मिळतो. या बँकेच्या पहिल्याच दिवशी तब्बल ४०० हून जास्त गरजू लोकांना कपड्यांचं वाटप करण्यात आलं.
कपड्यांअभावी गरिबांची कुचंबणा होऊ नये त्यांनाही चांगले कपडे मिळावेत, यासाठी ही बँक उघडल्याचं 'हारून मुक्ती इस्लामिक सेंटर' या संस्थेचे अध्यक्ष युसूफ मुकाती यांनी म्हटलंय.
आधी पोटाची खळगी भरण्याचा मार्ग सोपा केला आणि आता कपड्यांचा प्रश्न निकाली काढला, यामुळे या संस्थेचं सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे. जागरुक दात्यांनी सु्द्धा या चांगल्या उपक्रमात आपला खारीचा वाटा उचलण्याची गरज आहे.