औरंगाबाद : सहवासाची ओढ केवळ माणसातच असते असं नाही तर मुक्या प्राण्यांनाही माणसाचा लळा लागला की तो सूटत नाही. हेमलकसालातून राजा आणि रेणू ही बिबट्याची जोडी औरंगाबादच्या प्राणीसंग्रहालयात नुकतीच आणलीय. प्रकाश आमटें यांच्या सहवासात मुक्तपणे वाढलेल्या या बिबट्याच्या जोडीने अन्न-पाणी सोडलंय. जणू पिंजऱ्यातील कैद त्यांना नकोशी झालीय.
पिंजऱ्यात बंदिस्त आहे रेणू आणि राजा. बिबट्याच्या ही जोडी औरंगाबादच्या सिदार्थ प्राणीसंग्रहालयात१५ दिवसांपूर्वीच आलीय. मात्र या जोडीनं खाणं-पिणं सोडलंय. हे दोघेही पिंजऱ्यात सतत फेऱ्या मारत असतात. खरं तर त्यामागचं कारणही तसंच आहे. हेमलकसातील आमटेंच्या प्रकल्पात मुक्तपणे बागडणारी ही बिबट्याची जोडी आता पिंजऱ्यात बंदिस्त झालीय आणि त्यामुळेच त्यांची ही अवस्था झालीय. ही बिबट्याची जोडी आजवर एकत्र वावरत असे मात्र इथं त्यांना वेगवेगळ्या पिंजऱ्यात ठेवण्यात आलंय.
या बिबट्याच्या जोडीनं काहीतरी खावं यासाठी प्रयत्न सुरु आहेत. प्राणीसंग्रहालयातील कर्मचा-यांनी रेणूला फोनवरुन प्रकाश आमटेंचा आवाजही ऐकवला त्यानंतर ती थोडी सावरली. मात्र इकड तिकडं पाहून पुन्हा ती निराश झाली.
जी अवस्थआ रेणूची तीच राजाची आहे. इकडं रेणू जेवत नाही आहे तर तिकडं राजा जणू शून्यात नजर लावून बसला आहे. रेणूचा दुरावा त्याला सहन होत नाही असं चित्र. मुक्या प्राण्यांच्या मनाची घालमेल मन हेलावून टाकणारी आहे. त्यामुळं कदाचित रेणू राजा आणि आमटेंची भेटच या समस्येवर तोडगा असू शकेल.