भुजबळ पिता-पुत्रांच्या अवाढव्य संपत्तीची मोजदाद अजूनही सुरूच

महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी आज राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्याभोवतीचा फास आणखी आवळला गेलाय. 

Updated: Jun 16, 2015, 07:47 PM IST
भुजबळ पिता-पुत्रांच्या अवाढव्य संपत्तीची मोजदाद अजूनही सुरूच  title=

मुंबई : महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी आज राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्याभोवतीचा फास आणखी आवळला गेलाय. 

भुजबळांच्या मुंबई, नाशिक, येवला, मनमाड, ठाणे, लोणावळा, पुणे, नवी मुंबई याठिकाणच्या निवासी आणि व्यावसायिक मालमत्तांवर एकाचवेळी छापे घालण्यात आले. 

'अॅन्टी करप्शन ब्युरो'च्या वतीनं राज्यभरात तब्बल १६ ठिकाणी ही कारवाई करण्यात आलीय. याशिवाय पंकज भुजबळांच्या मनमाडमधल्या घरीही कारवाई करण्यात आलीय. नाशिकमध्ये तीन ठिकाणी, मुंबई आणि सांताक्रूझमधल्या भुजबळांच्या घरावर छापे टाकण्यात आलेत. पंकज भुजबळ यांच्याही घरावर एसीबीनं छापा टाकलाय. याखेरीज येवल्यामध्ये भुजबळांच्या संपर्क कार्यालयावरही धाड पडलीये... 

एसीबीनं हे छापे घालण्यासाठी तब्बल १५ सर्च टीम बनवल्या आहेत. व्हिडिओ शुटिंगच्या माध्यमातून ही कारवाई केली जातेय. एका टीममध्ये आठ ते दहा अधिकाऱ्यांचा समावेश असून, त्यामध्ये एक डीवायएसपी, दोन पीआय आणि दोन पंचांचांही समावेश आहे. 

भुजबळांच्या घरात सुरू असलेल्या शोध मोहिमेचा पहिला अहवाल संध्याकाळपर्यंत सादर करण्याचे आदेश सर्च टीमला देण्यात आलेत. 

भुजबळांकडे कुठून आली एव्हढी संपत्ती?
राष्ट्रवादीचे आमदार आणि छगन भुजबळ यांचे सुपुत्र पंकज भुजबळ यांच्या मनमाड येथील बंगल्यावर तसंच कार्यालयावरही आज एसीबीनं छापे घातले. आमदार पंकज भुजबळ नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.  त्यांच्या मनमाड येथील संपर्क कार्यालयावर  एसीबीने  धाड मारली आहे. नंदुरबार, धुळे येथील एसीबीच्या पथकाने ही कारवाई सुरु केली आहे. सुमारे १६ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या  पथकात समावेश असून,  त्यांनी संपर्क कार्यालय व  बंगल्याचा ताबा घेतला घेवून कसून तपासणी सुरु  केली आहे 

भुजबळांवरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक खात्यानं केलीय. ही कारवाई हायकोर्टाच्या देखरेखीत सुरू आहेत, त्यात सरकारचा हस्तक्षेप नसल्याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.