ऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - पाटण

राजकीय आखाड्यातील अत्यंत चुरशीची लढत जर कुठल्या मतदारसंघात होत असेल तर तो सातारा जिल्ह्यातला पाटण विधानसभा मतदारसंघ. गेल्या वेळी विक्रमसिंह पाटणकरांना अवघ्या 580 मतांनी विजय मिळवता आला होता. 

Updated: Oct 8, 2014, 03:24 PM IST
 title=

सातारा : राजकीय आखाड्यातील अत्यंत चुरशीची लढत जर कुठल्या मतदारसंघात होत असेल तर तो सातारा जिल्ह्यातला पाटण विधानसभा मतदारसंघ. गेल्या वेळी विक्रमसिंह पाटणकरांना अवघ्या 580 मतांनी विजय मिळवता आला होता. 

विधानसभा निवडणूक 2014 चे उमेदवार - 
शिवसेना - शंभूराज देसाई    
काँग्रेस - हिंदुराव पाटील
राष्ट्रवादी - सत्यजित पाटणकर
मनसे - राजेंद्र शेलार          

राजकीय आखाड्यात सातारा जिल्ह्यातील चुरशीचा मतदार संघ म्हणून पाटण विधानसभा मतदार संघाकडे पाहिलं जातं. याच कारण या मतदार संघात हमखास निवडूण कोण येईल हे छातीठोकपणे सांगणं कठीण आहे. 

दरवेळी हजार दोन हजार मतांच्या फरकानं विजय आणि पराजय इथं पहायला मिळतो. लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या या मतदारसंघावर गेली काही वर्ष आमदार विक्रमसिंह पाटणकर यांनी चांगलीच छाप पाडली आहे. 

१९८५, १९९०, १९९५, १९९९, २००९ अशा तब्बल पाच टर्म पाटणकर यांनी इथे यशस्वीपणे विजयी बाजी मारलीये. अपवाद २००४ मध्ये माजी आमदार शंभुराज देसाई विजयी झाले होते. 

गेल्या निवडणुकीचा विचार करता 2009 मध्ये विक्रमसिंह पाटणकर यांना ८७ हजार ९१७ मते, तर शंभुराज देसाई यांना ८७ हजार ३३७ मते मिळाली. या काट्याच्या लढतीत अवघ्या ५८० मतांनी पाटणकरांना निसटता विजय मिळाला होता. 

मतदारसंघात अनेक विकासकामे केल्याचा दावा आमदार विक्रमसिंह पाटणकर यांनी केलाय. 
- भूकंपनिधीचे वाटप
- घाटमाथ्यावरील गावे रस्त्याने जोडली
- पवनचक्क्यांच्या माध्यमातून २५०० लोकांना रोजगार
- कोयना नेहरू उद्यान 
आदी विविध कामे केल्याचं आमदार पाटणकर सांगतात. 

पाटणकरांनी विकासकामांचा दावा केला असला तरी माजी आमदार शंभुराजे देसाई यांनी मात्र पाटणकरांवर टीकास्त्र सोडलंय. पवनचक्क्यांच्या माध्यमातून जिल्ह्यात माफियाराज फोफावल्याचा धक्कादायक आरोप देसाई यांनी केलाय. 

पाटण तालुक्यात सर्वसामान्य जनता मात्र विकासांपासून कोसो दूर आहे. सर्वसामान्य माणसाला अनेक समस्यांनी घेरलंय. 
- ठिकठिकाणी रस्त्यांना खड्डे
- युवकांना रोजगार नाही
- पुलांची कामे अर्धवट
- गावांना जोडणारे रस्ते अर्धवट
 
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी विक्रमी मतांनी विजय मिळवला. मात्र, सातारा जिल्ह्यात लोकसभेची आणि विधानसभेची राजकीय समीकरणं वेगवेगळी बघायला मिळतात.

२ लाख ७२ हजार मतदार संख्या असलेल्या पाटण मतदार संघात पक्षीय राजकारणापेक्षा देसाई गट आणि पाटणकर गट यांच्यामध्येच खरी चुरस असते. 

महायुतीच्या तिकीटावर शंभुराजे देसाई निवडणूक लढविण्यास सज्ज झालेत. त्यामुळे पुन्हा एकदा इथे काँटे की टक्कर रंगणार यात शंका नाही. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.