शिवसेनेची बोळवण, केंद्रात एक, राज्यात दोनच मंत्रिपदे मिळणार?

 भाजप आणि मित्र पक्षांना मिळून निवडणुकीत १२३ जागा मिळाल्या आता बहुमत सिद्ध करण्यासाठी केवळ २२ आमदारांची गरज आहे. 

Updated: Oct 24, 2014, 01:41 PM IST
शिवसेनेची बोळवण, केंद्रात एक, राज्यात दोनच मंत्रिपदे मिळणार? title=

मुंबई :  भाजप आणि मित्र पक्षांना मिळून निवडणुकीत १२३ जागा मिळाल्या आता बहुमत सिद्ध करण्यासाठी केवळ २२ आमदारांची गरज आहे. अशा परिस्थितीत शिवसेना सरकारमध्ये सामील झाली तर कमी पडणाऱ्या आमदारांच्या संख्येच्या प्रमाणात म्हणजे केवळ दोन मंत्रीपद देण्याचे भाजपने ठरवले आहे. भाजप ठरवेल तेच शिवसेनेला मान्य करावे लागेल, असा संदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठविला असल्याचे सूत्रांननी सांगितले. 

भाजपला पाठिंबा देण्याबाबतची चर्चा करण्यासाठी दिल्लीत आलेले शिवसेना नेते खासदार अनिल देसाई आणि सुभाष देसाई यांना केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आधी मुलाखतीची वेळ न घेतल्याचे सांगून भेट नाकारली.

मात्र, पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यामार्फत शिवसेना नेते खासदार अनिल देसाई आणि सुभाष देसाई यांनी मंगळवारी केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेद्र प्रधान यांची भेट घेतली. त्या भेटीमध्ये शिवसेनेच्या पाठिंब्याच्या बदल्यात त्यांना केवळ दोनच खाती देण्याच्या प्रस्तावावर चर्चा झाल्याचे सांगण्यात येते.

या भेटीची माहिती प्रसारमाध्यमांना न देण्याचे भाजप आणि सेना नेत्यांमध्ये ठरले होते, परंतु सुभाष देसाई यांनी स्वत:हून झी मीडियाला ही माहिती दिली. तसेच दिवाळीनंतर बोलणी होईल असे देसाई यांनी स्पष्ट केले. 

शिवसेनेची जिरविण्याची हीच वेळ

शिवसेननेला यापुढे भाजप सांगेल त्याच अटी मान्य कराव्या लागतील. शिवसेनेची जिरविण्याची हीच वेळ आहे, अशा शब्दात शहा यांनी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना सूचना दिल्याचे सूत्रांनी सांगितले 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.