मुंबई: देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, विनोद तावडे, अजित पवार हे सर्वजण उमेदवार असूनही पक्षाच्या जाहिरातींवर त्यांचा फोटो आहे. त्यामुळं या जाहिरातींच्या खर्चाचा उमेदवारांच्या खर्चात समावेश करावा आणि हा खर्च २८ लाखांपेक्षा अधिक असल्यानं त्यांची उमेदवारी रद्द करावी अशी मागणी शिवसेनेनं निवडणूक आयोगाकडे केली आहे.
शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी मंगळवारी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या जाहिरातींवर आक्षेप घेतला. पृथ्वीराज चव्हाण आणि अजित पवार हे उमेदवार असल्यानं पक्षाच्या जाहिरातींवर त्यांचं छायाचित्र वापरण्यावरही रावतेंनी आक्षेप घेतला आहे.
उमेदवार असताना पक्षाच्या जाहिरातींमध्ये त्यांचं छायाचित्र झळकलं आहे. याद्वारे मतदारसंघातील मतदारांना आकर्षित केलं जात असल्यानं हा खर्च उमेदवारांच्या वैयक्तिक खर्चात धरला जावा. वैयक्तिक खर्चाची मर्यादा २८ लाख असल्यानं या सर्व जाहिरातींचा खर्च २८ लाखांपेक्षा जास्त होतो आणि त्यामुळं त्यांची उमेदवारी अपात्र ठरवावी अशी मागणी रावतेंनी केली.
यासंदर्भात निवडणूक आयोगाकडेही तक्रार केल्याचं रावतेंनी सांगितलं. तर शिवसेनेनंही पराभव स्वीकारल्यानं आमच्यावर आरोप केले असं, प्रत्युत्तर भाजप नेते राजीव प्रताप रुडी यांनी दिले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.