मतदानासाठी महाराष्ट्र सज्ज, मुंबईत ४० हजार पोलीस तैनात

महाराष्ट्राच्या विधानसभा मतदानासाठी निवडणूक आयोग सज्ज झालंय. अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर पोलीस यंत्रणेचं जास्त लक्ष असेल. मतदानाच्या अगोदरच्या दिवशी अवैध दारू आणि मतदारांना वाटण्यात येणाऱ्या काळ्या पैशावरही निवडणूक आयोगाचं लक्ष आहेच, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त नितीन गद्रे यांनी दिलीय. मतदार यादीत नाव असेल तरच मतदारांना मतदान करता येईल. मतदारांना याबाबत अधिक माहिती हवी असल्यास मतदारांनी १९५० या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहनही गद्रे यांनी केलंय.  

Updated: Oct 14, 2014, 01:29 PM IST
मतदानासाठी महाराष्ट्र सज्ज, मुंबईत ४० हजार पोलीस तैनात title=

मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभा मतदानासाठी निवडणूक आयोग सज्ज झालंय. अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर पोलीस यंत्रणेचं जास्त लक्ष असेल. मतदानाच्या अगोदरच्या दिवशी अवैध दारू आणि मतदारांना वाटण्यात येणाऱ्या काळ्या पैशावरही निवडणूक आयोगाचं लक्ष आहेच, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त नितीन गद्रे यांनी दिलीय. मतदार यादीत नाव असेल तरच मतदारांना मतदान करता येईल. मतदारांना याबाबत अधिक माहिती हवी असल्यास मतदारांनी १९५० या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहनही गद्रे यांनी केलंय.  

पोलीस आणि निवडणूक अधिकारी यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. ‘ईव्हीएम’ची सर्व यंत्रणा संबंधितांच्या ताब्यात देण्याची आलीय. ही यंत्रणा घेऊन प्रत्येक मतदान केंद्रांतील कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रांच्या अंतिम तयारीसाठी रवाना करण्यात आलंय. यासाठी, मुंबईत खास ‘बेस्ट’ बसेसचा ताफा सज्ज ठेवण्यात आला होता. तसंच काही टॅक्सींचीही मदत घेण्यात आलीय. यंत्रणेच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा मोठा फौजफाटाही तैनात करण्यात आलाय. 

राज्यात ६२६ मतदान केंद्र अतिसंवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आलीत. केवळ मुंबईत तब्बल ४० हजार पोलीस तैनात करण्यात आलेत.  

ठाण्यात ७६४ मतदान केंद्र संवेदनशील
ठाणे जिल्ह्यात एकूण १८ विधानसभा मतदारसंघांत ६ हजार १४५ मतदान केंद्रं आहेत. यापैंकी ७६४ मतदान केंद्र संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. या केंद्रांवर प्रशासनानं चोख बंदोबस्त केलाय. मतदान केंद्रांच्या १०० मीटर परिसरात कुठल्याही प्रकारच्या खाजगी वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आलीय. जिल्ह्यात आचारसंहिता भंगाचे ३५ गुन्हे दाखल करण्यात आले असून सुमारे १ कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आलीय. मतदान आणि मतमोजणीसाठी सुमारे ३५ हजार ४४३ कर्मचारी सज्ज आहेत. आचारसंहितेच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी ५३ भरारी पथकं, ३८ छायाचित्रण पथकं आणि खर्च तपासणीसाठी १८ पथक तैनात करण्यात आलेत. 

नवी मुंबईत केंद्रीय दलाच्या तुकडया हजर
दरम्यान, मतदान शांततेत पार पडावं यासाठी नवी मुंबई पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त केलाय. शहरात ५०० अधिकारी आणि साडे चार हजार पोलीस तैनात असतील. केंद्रीय दलाच्या पाच तुकड्याही नवी मुंबईत दाखल झाल्यात. आतापर्यंत ९०० जणांवर प्रतिबंधात्मक करवाई करण्यात आली आहे. १५ जणांना तडीपार करण्यात आलंय. तसंच २० बेकायदेशीर शस्र जप्त करण्यात आली आहेत. उद्याही मतदान केंद्रांवर चोख बंदोबस्त असेल, अशी हमी पोलिसांनी दिलीय.

जळगावात ८२ केंद्रांवर ‘सीआरपीएफ’ - ‘एसआरपीएफ’ तैनात 
जळगाव जिल्ह्यात ३१ लाख, २५ हजार, १५३ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यासाठी, ३३६० मतदान केंद्र उभारण्यात आलीत. ५६ मतदान केंद्र संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आलीत. अधिकारी कर्मचारी मिळून ६४३९ एवढा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आलेत. ८२ केंद्रांवर ‘सीआरपीएफ’चा बंदोबस्त ‘एसआरपीएफ’च्या सहा तुकड्या तैनात केल्या गेल्यात. आत्तापर्यंत इथं आचारसंहिता भंगाचे २४ गुन्ह्यांचा नोंद करण्यात आलीय. तर, नाकाबंदी करून वाहन तपासणी दरम्यान तब्बल २ कोटी ७७ लाख २० हजार एव्हढी रोकड जप्त करण्यात आलीय. 

रायगडमध्ये १४३९ शस्त्र जमा
रायगडमध्ये २७ पोलीस स्टेशनच्या हद्दीतून १४३९ शस्त्रं जमा करण्यात आलीत. रायगडमध्ये विविध पक्षांचे ८८ उमेदवार रिंगणात आहेत. इथं एकूण १९,८८,५०१ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. यासाठी २४८८ मतदान केंद्र सज्ज करण्यात आलेत. १२,१०५ महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मदत यासाठी घेण्यात आलीय. १,९४५ पोलिस कर्मचाऱ्यांसहीत सीआरपीएफच्या २ तुकड्या, एसआरपीएफच्या चार तुकड्या तसंच ५२० होमगार्ड इथं तैनात करण्यात आलेत.   

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.